शिलालेखात भाषेची विविध रूपे : डॉ. नीलेश शेळके
schedule03 Oct 25 person by visibility 48 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिलालेख हा भाषेच्या प्रवासाचे दाखले देणारे ऐतिहासिक आणि विश्वासार्ह वारसदार असून या शिलालेखांमध्ये भाषेची विविध रूपे सापडतात, असे प्रतिपादन शिलालेख अभ्यासक डॉ. नीलेश शेळके यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त आयोजित ‘शिलालेखातील मराठी’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे होते.
डॉ. शेळके म्हणाले, शिलालेख ही मराठी भाषेची समृद्धी आहे. शिलालेखांतून भाषेचा, राजवटींचा इतिहास ज्ञात होतो. जीर्णोद्धाराच्या नावाखाली आपण सांस्कृतिक इतिहास गाडत निघालो आहोत. अशा वेळी तरुण अभ्यासकांनी शिलालेखांचे जतन-वाचन करण्यासाठी पुढे येणे नितांत गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, पुस्तकांच्या बाहेरचे ज्ञानक्षेत्र म्हणून शिलालेख अभ्यासाकडे पाहिले पाहिजे. मराठी भाषेला विस्तारणारे क्षेत्र म्हणून संशोधकांनी याकडे वळण्याची आवश्यकता आहे.
रुपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी संशोधक विद्यार्थी, एम.ए.चे विद्यार्थी उपस्थित होते.