पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरव
schedule25 Jan 26 person by visibility 131 categoryराज्य
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील योगदानसाठी 131 मान्यवरांना हे पुरस्कार यंदा जाहीर झाले असून, यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एक 'पद्म विभूषण' तीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे मानाचे पुरस्कार घोषित केले जातात. 2026 च्या पुरस्कांरासाठी कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा समावेश आहे. देशभरातून एकूण 131 मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून त्यात 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय तसेच 16 व्यक्तींना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर 'पद्म विभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म भूषण श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक (कला), जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयूष पांडे (मरणोत्तर - कला) आणि बँकिंग क्षेत्रातील उदय कोटक (व्यापार व उद्योग) यांचा समावेश आहे.
पद्मश्री पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील 11 मान्यवरांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटपटू रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी श्रीमती आर्मिडा फर्नांडिस, समाजसेवेसाठी जनार्दन बापूराव बोथे आणि कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग देवाबा लाड यांचा समावेश आहे. कला क्षेत्रातून भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, रघुवीर तुकाराम खेडकर आणि सतीश शाह (मरणोत्तर) यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. तसेच व्यापार व उद्योग क्षेत्रातून अशोक खाडे व सत्यनारायण नुवाल आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातून जुझेर वासी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.
येत्या मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.