SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मतदान संविधानाने दिलेला अमूल्य अधिकार : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणीतखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शनमराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा ; मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णीप्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रमतखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शनचॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत घेतलेल्या खुल्या निसर्ग चित्र स्पर्धेला उदंड प्रतिसादअखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर व के.एम.टी. उपक्रमाच्या वतीने आयोजित “प्रवासी दिन” उत्साहात साजराकोरे अभियांत्रिकीत संशोधन लेखन विषयावर कार्यशाळालाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार 'भारत पर्व 2026'

जाहिरात

 

मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा ; मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

schedule25 Jan 26 person by visibility 80 categoryसामाजिक

  मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.

  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने आयोजित “व्याख्यानमाला” या कार्यक्रमात त्यांनी मराठीच्या अभिजात दर्जाचे महत्त्व, भाषेचा ऐतिहासिक प्रवास आणि पुढील टप्प्यातील विकास आराखडा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मराठीला अभिजात दर्जा मिळणे हे केवळ “शिक्कामोर्तब” नसून केंद्र शासनाच्या विशेष योजनेतून भाषाविकासासाठी संधी निर्माण करणारे असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यांनी महाराष्ट्रीन प्राकृत, अपभ्रंश आणि पुढील अर्वाचीन मराठी असा भाषेचा प्रवास मांडत वररूचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ ग्रंथाचा संदर्भ देऊन मराठीच्या प्राचीनत्वाचे पुरावे अधोरेखित केले. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, संतसाहित्य आणि १९ व्या शतकातील आधुनिक मराठीच्या वाटचालीचा आढावा घेत त्यांनी मराठीतील प्रतिभा, माधुर्य आणि मौलिकता यावर प्रकाश टाकला. मात्र ज्ञानेश्वरपूर्व दीड हजार वर्षांच्या भाषिक-लिखित परंपरेवर अपेक्षित संशोधन कमी झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

  अभिजात भाषा योजनेअंतर्गत राज्याला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची संधी मिळणार असून त्याची अधिसूचना फेब्रुवारी-मार्चपर्यंत अपेक्षित असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. यासाठी विभागाकडून डीपीआर (DPR) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध प्रस्ताव त्यात समाविष्ट केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अमरावती येथे झालेल्या ११ अभिजात भाषांच्या परिषदेचा उल्लेख करत ‘भाषिणी’ ॲपच्या माध्यमातून मराठीत केलेले भाषण तात्काळ इतर भाषांमध्ये दिसण्याचा प्रयोग राबवून महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषासंवादाचा नवा मार्ग दाखवल्याचे त्यांनी सांगितले.

  भाषांमधील “ज्ञानभाषा” आणि “लोकभाषा” या संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी प्राकृत ही सामान्यजनांची भाषा, संस्कृत ही ज्ञानभाषा आणि आजच्या काळात इंग्रजी ही प्रबंधांच्या प्रमाणामुळे ज्ञानभाषा ठरते, तर मराठी ही लोकजीवनातील संवादाची भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमाणभाषा ही विविध बोलीभाषांतील शब्द, व्याकरण आणि वापरातील पद्धती एकत्र येऊन तयार होते, त्यामुळे प्रमाणभाषा ही बोलीभाषांचे “अपत्य” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अभिजात’ या संकल्पनेबाबत त्यांनी विविध पाश्चात्त्य विचारप्रवाह, विश्वकोषातील नोंदी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सांगितलेले “आदर्शानुकरण” व “संकेतपालन” हे निकष समजावून सांगितले.

  मराठीच्या संवर्धन, संशोधन, अनुवाद आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विभागाने एका वर्षात मोठे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. मनुष्यबळ, जागा आणि प्रशिक्षण या तीन मुद्द्यांवर भर देत विविध भाषांचे वाचक, कॉन्झर्व्हेटर्स तयार करण्यासाठी प्रशिक्षणक्रम राबवले जातील, असे त्यांनी नमूद केले. निधी उभारणीसाठी सीएसआरच्या माध्यमातून मराठी उद्योजकांकडून मदत घेण्याचा पर्यायही त्यांनी सूचित केला. मराठी प्रभुत्वाशी संबंधित अनेक उद्योग-संधी उपलब्ध असून काही उद्योजकांचा टर्नओव्हर ५०० कोटींच्या पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले.

  संशोधनाच्या क्षेत्रात मराठीच्या १,५०० वर्षांच्या दुर्लक्षित कालखंडावर अधिक अभ्यासाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुढील टप्प्यात प्रकाशन व अनुवादासाठी ‘अनुवाद अकॅडमी’ ही स्वायत्त संस्था स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे मशीन ट्रान्सलेशन सक्षम होत असून मराठीतील स्पेल चेक, शब्दपर्याय, प्रेडिक्टिव्ह टायपिंग यांसारख्या सुविधा विकसित करण्यासाठी लोकांनी मोबाईलवर अधिकाधिक मराठी टाइप करावे, असे आवाहनही त्यांनी केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी अभिजात दर्जानंतरच्या नियोजनासाठी उपस्थितांच्या सूचना मागवत मराठीच्या भविष्यकालीन विकासासाठी सामूहिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.मीनल जोगळेकर, सल्लागार समितीचे सदस्य डॉ.शिरीष ठाकूर तसेच मराठी भाषा अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes