एकात्म मानव दर्शन ही आदर्श जीवन पद्धती: सुहास क्षीरसागर; शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
schedule08 Sep 25 person by visibility 164 categoryक्रीडा

कोल्हापूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेली एकात्म मानव दर्शन ही जीवन जगण्याची आदर्श पद्धती असल्याचे प्रतिपादन प्रख्यात वक्ते सुहास क्षीरसागर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयातील नियुक्त समन्वयकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण व माहिती कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
क्षीरसागर म्हणाले, आत्मविश्वास आणि पुरूषार्थ यांना उजाळा देत देशातील नागरिकांमध्ये स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा जागृत करणे हे एकात्म मानव दर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बलशाली राष्ट्रनिर्मितीची भावना देशातील नागरिकांच्या मनात जागविणे आवश्यक आहे. त्याची सुरवात प्रत्येक घरापासून व्हायला हवी, यासाठी हे अभियान माननीय राजभवन कार्यालयाकडून प्रेरित करण्यात आले आहे.
यावेळी अधिसभा सदस्य मनोज पाटील संकलित आणि डॉ. राजाराम गुरव संपादित पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारकार्यविषयक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पंडितजींच्या समाजचिंतन करणाऱ्या उदात्त विचारसरणीचा यामध्ये वेध घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजाराम गुरव यांनी केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास मार्गदर्शक डॉ. दत्तात्रय गर्गे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, डॉ. जी.बी. दीक्षित यांच्यासह महाविद्यालयीन समन्वयक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.