शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर परिसरासह विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम
schedule12 Sep 25 person by visibility 140 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त पारितोषक कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम पार पडली.
महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत आयोजित या मोहिमेत विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, विकास भोसले, सिटी कोऑर्डिनेटर हेमंत काशीद, मेघराज चडचणकर यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक, मुकादम, अग्नीशमनचे जवान, उद्यान विभागाचे कर्मचारी व जवळपास 70 सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.
या स्वच्छता मोहिमेत महालक्ष्मी मंदिर परिसर, भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिर परिसर, पागा बिल्डिंग, मोती बाग तालीम रोड, मेन राजाराम हायस्कूल परिसर, जोतिबा रोड, एसएलजी हायस्कूल रोड अशा महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. तसेच शाहू मिलच्या आतील परिसरातील संपूर्ण स्वच्छता करुन 2 डंपर तनकट व इतर कचरा उठाव करण्यात आला. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या फायर फायटर वाहनाद्वारे 2 हॉलची पाणी मारुन स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे मंदिर परिसर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेस महापालिकेच्यावतीने विशेष स्वच्छता करण्यात येत आहे.