कोल्हापूर महानगरपालिका व महाप्रीत यांच्यात सामंजस्य करार
schedule12 Sep 25 person by visibility 179 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि शासकीय संस्था महात्मा फुले रिनिव्हेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT) यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा प्रमुख उद्देश ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, महापालिकेच्या इमारतीवर सौर रूफटॉप प्रकल्प, पाणी शुद्धीकरण प्रकल्प व एसटीपीवर सौर प्रणाली, ई-चार्जिंग स्टेशन, मालमत्ता कर मूल्यांकन, वाहतूक व्यवस्थापन तसेच डिजिटल जाहिरात उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, शून्य कार्बन उपक्रम, पर्यावरण संरक्षण, नव व नवीकरणीय ऊर्जा आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रांत संयुक्तरीत्या प्रकल्प राबविण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.
हा करार नगरविकास राज्यमंत्री व सह-पालकमंत्री सौ. माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यासाठी पालकमंत्री ना. प्रकाश अबिटकर व प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या पुढाकाराने शासन व कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्तरावर विविध धोरणात्मक प्रकल्प राबविणेचे अनुषंगाने सरकार ते सरकार (G-2-G) महाप्रीत आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शाहूजी सभागृहात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, अपर पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरच्या सामंजस्य करारावर महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, महाप्रीतच्यावतीने मुख्य व्यवस्थापक संतोष वाहणे, महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांच्या स्वाक्षरीने करण्यात आला.