शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दीपोत्सव उत्साहात
schedule18 Oct 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. विविध देशांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेत पारंपरिक पोशाख, दिवे, रांगोळी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळे, डॉ. मीना पोतदार, विद्युत अभियंता अमित कांबळे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात सध्या दक्षिण आफ्रिका, सुदान, मालावी, तुवालू, फिजी, पेरू, मॉरिशस, इंडोनेशिया, मादागास्कर, बांगलादेश, नेपाळ या देशांतील विद्यार्थी विविध अधिविभागांत उच्चशिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा व सणांमध्ये सामावून घेतले जाते. देशातील सर्वांत मोठ्या व प्रकाशरुपी ज्ञानाचा उत्सव असणाऱ्या दिवाळी सणही दरवर्षी या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात येतो. यंदाही दिवाळीच्या पूर्वसंध्येला साजऱ्या करण्यात आलेल्या या दीपोत्सवात विद्यार्थ्यांनी पारंपरिक गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दिवे, पणत्या प्रज्वलित करत दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी उपस्थितांना आपला परिचय करून देत आपले विद्यापीठातील अनुभवही सांगितले.
कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, “भारतीय संस्कृती जगभरातील लोकांना आपलेसे करते. विविध देशांतून आलेले विद्यार्थी जेव्हा आपल्या सणांमध्ये सहभागी होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पना साकार होते.” यावेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक फराळासह मिठाईचे वाटप करण्यात आले.