डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये रोजगार मेळावा उत्साहात; स्वप्नपूर्तीमुळे तरुणांना आनंद
schedule28 Jun 25 person by visibility 157 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा रोजगाराभिमुख तरुणांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. या मेळाव्यात सुमारे 300 युवक युवतींना अपेक्षित रोजगार मिळाल्याने समाधान आणि आनंद दिसून येत होता.
इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सुमारे 650 उमेदवार यामध्ये सहभागी झाले. ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या निकषावर उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. 28 उद्योजकांनी 1470 रिक्त जागांसाठी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, "अशा रोजगार मेळाव्यांचा युवकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. करिअर संधी आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे". संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी , " युवकांनी ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. सक्षम आणि सकारात्मक विचारसरणी असणारे मनुष्यबळ या अर्थाने स्वतःची प्रतिमा निर्माण करावी. आता भारत युवकांचे राष्ट्र आहे. रोजगार प्राप्तीमुळे युवकांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळेल " असे प्रतिपादन केले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड, डुणुंग इंडस्ट्रीज, मंत्री मेटॅलिक्स, एस बी रिशेलर्स, पद्मावती कास्टिंग अँड फोर्जिंग सहित विविध नामांकित कंपन्या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या.
या रोजगार मेळाव्याचा आम्हाला खूपच फायदा झाला असून, अशा मेळाव्यांचे नियमितपणे आयोजन करावे, अशा भावना युवकांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, सहायक आयुक्त कौशल्य विकास जमीर करीम, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, गोकुळ एमआयडीसीचे अध्यक्ष स्वरूप कदम आदी मान्यवरांसहित उद्योजक, उमेदवार तरुण, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले. प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पी. टी. पानसरे यांनी समन्वयन केले.