गिरीश फोंडे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरकर मोर्चाद्वारे एकवटले
schedule17 Apr 25 person by visibility 275 categoryराज्य

▪️निलंबन मागे न घेतल्यास शिक्षकांचा काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा
▪️इंडिया आघाडी, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कामगार कृती समिती दारूबंदी संघर्ष समिती व विद्यार्थी संघटना यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन
कोल्हापूर : महानगरपालिकेकडील सहायक शिक्षक व समाजसेवक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. जर निलंबन कारवाई रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीश फोंडे यांना 4 एप्रिल रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व कर्जमाफीसाठी एकनाथ शिंदे आंदोलनाच्या इशारा दिल्यामुळे महायुती सरकारच्या आदेशावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या अनुषंगानं शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरुद्ध बोलणं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफी या मुद्द्यावर कोल्हापूर दौऱ्यास विरोध दर्शवणं, यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गिरीश फोंडे आणि सर्व संघटनांच्या वतीनं करण्यात आला आहे. ही निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी सर्व संघटनांच्या वतीनं आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या आधी अनेक मान्यवरांनी भवानी मंडप याठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत सरकारच्या दडपशाहीला विरोध दर्शवला.
माजी आमदार संपत बापू पाटील यांनी, ही सरळ सरळ हुकूमशाही असून याविरोध एकजुटीनं लढलं पाहिजे असं आवाहन केलं. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन दडपण्याचा या सरकारचा डाव आहे, या निलंबनाच्या कारवाईवरून त्यांचे मनसुबे स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर भवानी मंडपातून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये इंडिया आघाड्यातील घटक पक्ष, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना कृती समिती, दारूबंदी संघर्ष समिती, विद्यार्थी संघटना कृती समिती यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा. शेती वाचवा, देश वाचवा. असं आशय लिहिलेल्या टोप्या परिधान करून शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा टोप्या शिक्षकांनी देखील घातल्या. भारतीय संविधान जिंदाबाद. गिरीश फोंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. इन्कलाब जिंदाबाद.
गिरीश फोंडे तुम मागे बढो, हम तुम्हारे साथ है,गिरीश फोंडे यांच्यावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,आंदोलकांची मुस्कटदाबी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो,आंदोलन हमारा अधिकार, बंद करो अत्याचार,रा. शाहू महाराज की धरती पर, पुलिस अत्याचार नही चलेगा,किसान शिक्षक मजदूर एकता जिंदाबाद अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. यानंतर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं. जर निलंबनाची कारवाई रद्द झाली नाही तर महापालिकेचे शिक्षक संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी, शक्त्तीपीठ महामार्ग मागे पन्नास हजार कोटी हडपण्याचा सरकारचा डाव असल्याचे आरोप केले. यासह ही निलंबन कारवाई म्हणजे दडपशाही असून, जर कारवाई मागे घेतली नाही तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल अशा इशारा यावेळी त्यांनी दिला.
विजय देवणे म्हणाले," शिक्षक हे देखील नागरिक आहेत त्यांना भारतीय संविधान लागू आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना देखील आहे. आयुक्तांना मंत्र्यांच्या आदेशावर आंधळा कारभार करणे चालू ठेवल्यास त्यांच्या बदलीची मागणी करू असे ठणकावून सांगितले.
*शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड म्हणाले*," आज गिरीश फोंडे यांच्यावर कारवाई करत उद्या कोणी शिक्षक काही बोलला तर त्यांच्यावर कारवाईचा सपाटा सरकार लावेल. निलंबन मागे न घेतल्यास शिक्षक संपावर जातील.
सचिन चव्हाण यांनी महानगरपालिकेतील अधिकारी जनतेच्या प्रश्नासाठी कधी रात्री मीटिंग घेतात काय असा सवाल करत गिरीश फोंडे यांच्या निलंबनासाठी 3 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता मीटिंग घेताच कशी काय असा सवाल केला?
या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपत बापू पवार, उद्धव सेनेचे विजय देवणे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, अनिल लवेकर, डॉ. सुनील कुमार लवटे,भरत रसाळे, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, दिलीप पवार, अतुल दिघे, सतीश चंद्र कांबळे, दिगंबर लोहार, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, कादर मलबारी, प्रभाकर आरडे, आपचे उत्तम पाटील, सीमा पाटील, अनिल लवेकर, बाबासाहेब देवकर यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे शिवाजी मगदूम, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, सम्राट मोरे, कृष्णात पाटील,शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी लाड, दादा लाड, राजेश वरक ,भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, उमेश देसाई, राजेंद्र कोरे,विलास पिंगळे, दिलीप माने, संतोष आयरे, विद्यार्थी संघटनांचे शुभम शिरहट्टी, प्रशांत आंबी, मंजीत माने. दारूबंदी चळवळीचे धनाजी सावंत, सुनंदा शिंदे, अनिल कोळी, आंतरराष्ट्रीय व्यवस्था केंद्राचे आकाश कांबळे, अनिल चव्हाण, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
