आदर्श गणेशोत्सव म्हणून कोल्हापूरची ओळख व्हावी : आ. राजेश क्षीरसागर
schedule31 Aug 26 person by visibility 171 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूरने नेहमीच राज्याला एक वेगळी ओळख दिली आहे. राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्या - मुंबईच्या ऐवजी येथील गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यात ' आदर्श गणेशोत्सव ' म्हणून ओळखला जावा अशी अपेक्षा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली .
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लोकप्रतिनिधी,गणेश मंडळ पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शांतता कमिटी सदस्य यांची गणेशोत्सव सन - 2026 अनुषंगाने सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड,पोलीस अधीक्षक निलोत्पल, शहर उपअधिक्षक प्रिया पाटील , करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा कोल्हापूर जिल्ह्याने आजवर जपला आहे. नियमांचे पालन करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासह विविध सामाजिक संदेशावर आधारित देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही याची दक्षता घेऊन तसेच कोणतेही गालबोट लागू न देता हा उत्सव आनंदाने - उत्साहाने साजरा करावा असे आवाहनही क्षीरसागर यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ राठोड म्हणाले, या उत्सवाद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश द्यावा.त्याचबरोबर गरिबांना आवश्यक ते सहाय्य करावे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून नो डीजे, नो डॉल्बी , नो लेझर असा हा उत्सव सर्व कोल्हापूरवासीयांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.असे सांगून गणपती मंडळाचे डिपॉझिट MSEB ने सात दिवसात परत करावे यासाठी त्यांना आदेशित करू असे सांगितले .
मनपा आयुक्त डॉ.भारूड म्हणाले,येत्या 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.तोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने शहरातील बहुतांशी खड्डे बुजवण्याला मनपा प्राधान्य देईल तसेच कोल्हापूरच्या या गणेशोत्सवाने राज्याला एक नवी दिशा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली .
◼️कायद्याच्या चौकटी पाळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; पारंपरिक वाद्यांच्या वापर करा : पोलीस अधीक्षक निलोत्पल
निलोत्पल म्हणाले, गणेश मूर्तीचा आकार डॉल्बीचा आवाज , मंडळाभोवती जमणाऱ्या नागरिकांची संख्या, मोठा मंडप यावर गणेशाची श्रद्धा ठरत नाही. कोल्हापूरला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवामध्ये लेझरचा वापर करु नका . डीजेला बंदी नसली तरीही आवाजाची मर्यादा पाळा . Co2 (गॅस) ला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येणार नाही तसेच मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्यावा. महाप्रसादाचे चेकिंग एफडीए मार्फत करण्यात येईल ,गणेशोत्सव कालखंडात पोलीस विभागातर्फे 24x7 एक कंट्रोल रूम कार्यरत ठेवण्यात येईल.बाप्पाच्या आगमन - निर्गमना वेळी मंडळांनी चांगले स्ट्रक्चर ठेवावे जेणेकरून कोणती दुर्घटना घडणार नाही . तसेच सर्वच मंडळासाठी पोलीस प्रशासन समान कायदा वापरणार असून जिल्ह्यातील मंडळांनी या कालखंडात प्रत्येकी दोन - दोन सीसीटीव्ही लावण्याला प्राधान्य द्यावे त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर गणेश मंडळांनी महाद्वार रोड ऐवजी इतर पर्यायी मार्गाचाही विचार करावा असे आवाहन केले .
याप्रसंगी शांतता व दक्षता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. या मिरवणूक काळामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक द्यावा, मिरवणूक मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत रहावी, सर्व गणेश मंडळांना महाद्वार रोडवरील मिरवणुकीत सहभागी होता येण्यासाठी मिरवणूक रेंगाळणार नाही यासाठी उपाययोजना व्हावी, सर्व मंडळांना समान न्याय द्यावा, शहरातील रस्त्यांची श्री गणेश आगमनापूर्वी दुरुस्ती व्हावी, आदी सूचना मांडून कोल्हापूरचा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. महा समितीच्या वतीने जिल्ह्यातील गणेशोत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी विविध सूचनांचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना यावेळी देण्यात आले . याप्रसंगी पोलीस विभागातील इतर अधिकारी - कर्मचारी तसेच विधिध मंडळाचे आजी माजी अध्यक्ष - पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .