SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन; समाधीस्थळाला भेटभारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साहात स्वागतदेशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात उत्साहात स्वागतराज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विदयार्थी विजयीदहीहंडी द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पी ए, निमा व निहा या असोसिएशनयांच्या संयुक्तपणे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहातडी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहातविद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहात अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटनकोल्हापुरात विनापरवाना बेकायदा रिव्हॉल्वरसह तीन जणांना घेतले ताब्यात भारताला समृद्ध बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे : प्राचार्य डॉ. गजानन खाडे

जाहिरात

 

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचा संकल्प सर्वजण मिळून करू : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जिल्हावासियांना आवाहन

schedule15 Aug 25 person by visibility 229 categoryराज्य

▪️पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण संपन्न

कोल्हापूर : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्यातून जिल्ह्याची कृषी, उद्योग, आरोग्य, कला, क्रीडा, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान इ. सर्वच क्षेत्रात प्रगती साधली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा संकल्प सर्वजण मिळून करुया, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

 भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई सभागृह येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेतील अग्नीशमन विभागातील सेवेतील भगवंत बबन शिंगाडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तर सैन्य दलात कार्यरत असताना देशांतर्गत सुरक्षा मोहिमेत अपंगत्व आलेले सेवारत सैनिक हवालदार संजय जयसिंग पाटील, शिपाई नितीन संभाजी बोडके, हवालदार संतोष सदाशिव तोडकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यात राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेले  प्रथम क्रमांक प्राप्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्रकुमार शेट्ये, उपअभियंता महेश कांजर, बाल विकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक, तर राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक देसाई, पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल कुदळे, नगरपरिषद  मुख्याधिकारी अजय पाटणकर, उपअभियंता संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे तसेच तृत्तीय क्रमांक प्राप्त अधिकारी व अवयवदान करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूरवासियांच्या पन्नास वर्षांच्या ऐतिहासिक लढ्याला यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे रविवारी उद्घाटन होत आहे. या सर्कीट बेंचच्या माध्यमातून कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांसाठी न्यायदानाची सोय उपलब्ध होणार आहे.

 नाविण्यपूर्ण प्रयोग राबविण्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियानांतून लाखो नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करुन देण्यात प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले आहे.  सेवा हमी हक्क कायद्यातील पथदर्शी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज ई-ऑफिस प्रणालीवर होत आहे. 

पालकमंत्री  आबिटकर म्हणाले, अत्याधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळा, प्रस्तावित जिल्हा महिला रुग्णालयासह कॅन्सर हॉस्पीटलच्या निर्मीतीसाठी प्रयत्न होत असून जिल्ह्यात सक्षम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहे. आरोग्य पर्यटनालाही जिल्ह्यात चांगला वाव असून मेडिकल टुरिझम हब म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून अवयवदानाची चळवळ राज्यासह देशभरात राबवली जात असून या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या  जागतिक वारसा स्थळाच्या यादीत झाला असून पन्हाळ्यासह भूदरगड, विशाळगड, रांगणा, सामानगड, पारगड आदी किल्यांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतुद करण्यात येत आहे. तसेच दाजीपूर अभयारण्य, सवतकडा, राऊतवाडी, नितवडे धबधबा परिसर अशा निसर्गाच्या कुशीत लपलेल्या पर्यटन स्थळांचाही विकास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येत आहेत. करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुमारे 1400 कोटींच्या निधीची तरतूद केली असून श्री क्षेत्र जोतिबा, श्री नृसिंहवाडी, श्री बाळुमामा आदी तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासातून कलानगरी म्हणून असलेली कोल्हापूरची ओळख अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

शिक्षण क्षेत्रातही जिल्ह्यात उल्लेखनीय काम होत असून परख राष्ट्रीय सर्वेक्षणात जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. समृद्ध शाळा अभियान यशस्वीपणे राबविले असून कोल्हापूर शिक्षण विभागाचे काम राज्यात कौतुकास्पद होत आहे.

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील मुला-मुलींचा शैक्षणिक विकास साधला जात आहे. दुग्ध उत्पादनात जिल्ह्याचे काम चांगले सुरु आहे.  महाआवास अभियानांतर्गंत 26 जानेवारी 2026 पर्यंत जिल्ह्यात 50 हजार घरकुलांचे लोकार्पण राज्याच्या मुख्यमंत्रांच्या हस्ते वितरीत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत 7/12 उता-यात पुरुषांबरोबर स्रियांच्या मालकी हक्काची नोंद करण्यात येत आहे.  महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातून महिलांच्या हाताला शाश्वत रोजगार उपलब्ध करुन देवून  महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हेक्टरी 125 टन ऊस लागवडीसह अनेक योजना व उपक्रम कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. सांगरुळ येथील कोल्हापूरी चप्पल युनीटच्या कामासाठी 1 कोटी 29 लाख रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येत आहे.

आयटी पार्कच्या निर्मिती बरोबरच जिल्याध तील एमआयडीसी मधील विविध उद्योगांना चालना देत हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला अधिक गती देण्याबरोबरच तालुका व जिल्हा क्रीडा संकुलाला निधी देवून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण  करण्यासाठी  कालबध्द आराखड्याच्या माध्यमातून या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे, असे पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तर सूत्रसंचालन गिरीश सोनार यांनी केले.

▪️मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण संपन्न
कोल्हापूर : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes