भारताला समृद्ध बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे : प्राचार्य डॉ. गजानन खाडे
schedule16 Aug 25 person by visibility 169 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, 'ग्रँड मास्टर’ दिव्या देशमुख,विश्वविजेता डी गुकेश आदींनी आपल्या असाधारण प्रतिभेने आणि अथक समर्पणाने संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. अनेक संकटाना,आव्हानाना सामोरे जात आपल्या देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक प्रगतीची मोहोर उमटविली आहे. जाज्वल देशभक्ती, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा या त्रिसूत्रीच्या जोरावर देशाच्या सीमारक्षेवर जवान कर्तव्य बजावत आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरच्या माध्यमातून देशाला समृद्ध बनविण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी केले.
येथील शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष असणाऱ्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ उत्साहात संपन्न झाला . यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रशालेचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे बोलत होते. सर्व प्रथम प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या हस्ते ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त ध्वजारोहण करण्यात आले.
उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. पी. माळवे,पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. पत्रावळे,प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. प्रारंभी १२ वीच्या विद्यार्थ्यांनी परेड देत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सामुदायिक रित्या सादर करण्यात आले. भारत माता की जय या घोषणा यावेळी देण्यात आल्या. उजमा आसीफ शिंदी, निरंजन पाटील, वैष्णवी कांबळे, प्रणाली तोडकर, पायल डवंग, सृष्टी कंदाले आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. हर घर तिरंगा २०२५ मोहिमेअंतर्गत प्रा. सुषमा पाटील यांच्या संयोजनातून प्रशालेत घेण्यात आलेल्या रांगोळी, निबंध, काव्य वाचन, वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ.गजानन खाडे म्हणाले यशवंतराव चव्हाण, जे.पी. नाईक, डॉ. जयंत नारळीकर,अण्णासाहेब लट्टे, खाशाबा जाधव, जयसिंगराव पवार, डॉ. यशवंत थोरात अशा अनेक प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर राष्ट्र उभारणीसाठी योगदान दिलेले आहे. प्रशालेचा हाच वसा आणि वारसा विद्यार्थ्यांनी जोपासून समाज उन्नतीसाठी कार्य करावे. स्वतः च्या प्रगती बरोबर राष्ट्राच्या प्रगती साठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रामाणिकपणे कर्तव्य करून भारताला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने आपणास मिळालेले हे स्वातंत्र्य देशाप्रती निस्सीम प्रेम ठेवत सर्वानी जतन करुयात असे सांगत प्राचार्यानी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रा. बी.पी.माळवे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. राहूल देशमुख यांनी आभार मानले.