विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहात अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन
schedule16 Aug 25 person by visibility 80 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा कार्यान्वित झाल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व्यायाम करून आरोग्याकडेही चांगले लक्ष पुरवावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारामध्ये अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारण्यात आली असून तिचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात १६१५ चौरस फुट इतक्या जागेवर ही व्यायामशाळा उभारण्यात आली असून तिच्या उभारणीसाठी १३ लाख ८५ हजार ६५४ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. व्यायामशाळेत मल्टी ट्वेल्ह्व स्टेशन जीमसह केबल क्रॉस ओव्हर मशीन, पेक डेक, लॅट पुली, रोईंग मशीन, अॅडक्टर मशीन, लेग कर्ल व एक्स्टेंशन मशीन आणि केबल अँड पुली मशीन अशी अत्याधुनिक साधने उपलब्ध करण्यात आली आहेत.
उद्घाटनानंतर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी उपस्थितांना व्यायामशाळेतील विविध उपकरणांवर व्यायाम कसा करतात, याची प्रात्यक्षिके दाखविली. त्यानुसार कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांनी या उपकरणांवर हलकासा सराव करून पाहिला आणि समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते कंत्राटदार शशिकांत येजरे आणि आर्किटेक्ट नीलेश सुतार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. ज्योती जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परूळेकर, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, विद्युत अभियंता अमित कांबळे, क्रीडा संचालक डॉ. एन. डी पाटील, प्रा. किरण पाटील, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. राम पवार, सुभाष पवार, प्रा. सुचय खोपडे, वसतिगृहाचे मुख्य अधीक्षक डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. उमेश गडेकर, डॉ. युवराज जाधव, डॉ. गळगे, अभियांत्रिकी विभागाचे विजय पोवार, शिवकुमार ध्याडे, वैभव आर्डेकर, जी.बी. मस्ती यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.