महादेवी हत्ती परत द्यावा, नांदणी ते कोल्हापूर विराट पदयात्रा; मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बैठक बोलावली
schedule03 Aug 25 person by visibility 279 categoryराज्य

कोल्हापूर : महादेवी हत्ती परत द्यावा या मागणीसाठी आज नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या या पदयात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंगळवारी (५ऑगस्ट रोजी) बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
नांदणी पासून सुरू झालेली पदयात्रा कोल्हापूर -सांगली महामार्ग, पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात आली. ताराराणी पुतळा मार्गे ती जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर तेथे माधुरी परत करा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पदयात्रेतील लोकांनी माधुरी परत करा, एक रविवार माधुरीसाठी, जिओ बहिष्कार असे लिहलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.
यावेळी राजू शेट्टी यांनी महादेवी हत्ती परत करावी ही मागणी आहे. त्यासाठी जिओवर बहिष्कार हे पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे रिलायन्स मॉलवर देखील बहिष्कार टाकू. वनतारा केंद्र हेच बेकायदेशीर आहे, असा आरोप केला.
नांदणी येथील मठात गेली ३५ वर्षे असणाऱ्या महादेवी हत्तीला पेटा या संस्थेच्या माध्यमातून गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले आहे. या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली असून शिरोळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात महादेवी हत्ती परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लढे सुरू झाले आहेत.
त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार ५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे महादेवी हत्ती संदर्भातील विषयावर तातडीने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सर्व लोकप्रतिनिधी, नांदणी मठाचे प्रमुख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.