बालकल्याण संकुलाच्या अडचणी सोडवणार : महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे
schedule07 Aug 25 person by visibility 197 categoryसामाजिक

▪️वंचित, दुर्लक्षित व अनाथांप्रति राज्य शासन संवेदनशील; शासकीय नोकरीत अनाथांना आरक्षणाचा 700 हून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ
▪️'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेच्या जाहिरातीद्वारे राज्यभर झळकणार बालकल्याणच्या रुक्मिणीचे पेंटिंग
▪️शिशुगृहाच्या अनुदानाबाबत देणार तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
कोल्हापूर : अनाथ मुला मुलींना मायेची ऊब मिळवून देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बालकल्याण संकुलासाठीची मनुष्यबळ भरती, मानधनवाढ यांसाठी प्रयत्न सुरु असून येथील शिशुगृहाच्या अनुदानाबाबत महिला बालविभागाच्या आयुक्तांकडून माहिती घेऊन याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सांगून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या शासकीय योजनेच्या जाहिरातीसाठी कोल्हापूर येथील बालकल्याण संकुलातील रुक्मिणी राठोड हिच्याकडून बनवण्यात येणाऱ्या पेंटिंगचा वापर करण्यात येईल, असे आश्वासन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज जिल्हा परिषद व अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलातील विविध विभागांना भेट देऊन येथील मुला मुलींशी संवाद साधला. तसेच येथील मुला मुलींनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट देऊन समाधान व्यक्त केले. या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या कलाकृती पाहून मंत्री श्रीमती आदिती तटकरे भारावून गेल्या.
लहानपणापासूनच बालकल्याण संकुलात राहणाऱ्या रुक्मिणी राठोड हिने केलेल्या पेंटिंग कलाकृती पाहून महिला व बालविकास विभागाच्या जाहिरातीमध्ये तिचे पेंटिंग वापरण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, सह कार्यवाह एस. एन.पाटील, निरंजन वायचळ तसेच संचालक सुरेश शिपुरकर, प्रदीप कापडिया, व्यंकाप्पा भोसले, डॉ.वैशाली नानिवडेकर, उत्तम पाटील, चतुरसिंह भोसले तसेच बालकल्याण समिती सदस्य ॲड. शिल्पा सुतार, ॲड. अश्विनी खाडे, पद्मजा गारे तसेच रवींद्र पंदारे, मेघना पंदारे आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या, वंचित, दुर्लक्षित व अनाथांप्रति राज्य शासन संवेदनशील असून त्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. अनाथांना शासकीय नोकरीत एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याचा लाभ घेऊन आजवर शासकीय नोकरीत 700 हून अधिक अनाथ उमेदवारांची भरती झाली असून यातील 600 हून अधिक उमेदवार वर्ग 3 मधील आहेत. येत्या काळात या संख्येत आणखी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून श्रीमती तटकरे म्हणाल्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बालकल्याण संकुलाची यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. अनाथ मुला मुलींना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना माया, ममता आणि प्रेमाची ऊब तसेच बालकांना हक्काचं घर मिळवून देऊन कुटुंबाचं वात्सल्य मिळवून देण्यासाठीही बालकल्याण संकुलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, ही मोलाची बाब आहे, अशा शब्दांत संस्थेच्या कामाचे, पदाधिकाऱ्यांचे व बाल कल्याण समिती सदस्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. बालकल्याण संकुलात राहताना येथील मुला-मुलींनी अभ्यासाबरोबरच छंद व खेळाची आवड जोपासावी. तसेच आपल्या अंगच्या कलागुणांचा विकास साधून जीवनात यशस्वी व्हा, असा मूलमंत्र मंत्री श्रीमती तटकरे यांनी दिला.
पद्मजा तिवले यांनी संस्थेची आजवरची वाटचाल विशद करुन संस्थेसमोरील अडचणी मांडल्या.