कोल्हापुरी चप्पल युनिटसाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करा : अदिती तटकरे
schedule07 Aug 25 person by visibility 278 categoryराज्य

▪️नवतेजस्विनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत कोल्हापुरी चप्पल प्रकल्पास प्रोत्साहनाचे आश्वासन
▪️शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे माविम, महिला उद्योजिका व बचत गटांसमवेत चर्चा
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरी व तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे माविम, महिला उद्योजिका व बचत गटांसमवेत त्यांनी चर्चा केली, यावेळी त्या बोलत होत्या.
प्रशासनामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ येथे कोल्हापुरी चप्पल युनिट सुरू करण्याबाबत कामे सुरू असून १० गावातील १५० महिला सहभागी आहेत. १ कोटी २९ लाख रुपयांच्या या प्रकल्पाचासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात ४० लक्ष रुपये देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र यांच्याकडून कोल्हापुरी चप्पल अजून आरामदायी आणि आधुनिक होण्यासाठी आवश्यक मशिनरी व तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती देण्यात आली.
युनिटसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ८० लाख रुपये माविमकडून ३० लाख रुपये व सीएमआरसी स्वतः १९ लाख रुपये गुंतवून प्रकल्प सुरू करणार आहे. यातील ३८ लाख रुपयांच्या विविध मशिनरी खरेदी करण्यात आले असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. या कोल्हापुरी चप्पल युनिट साठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती मागणी असणारा कंफर्ट अर्थात आरामदायीपणा तसेच चप्पलच्या ब्रँड आणि डिझाईन मधील आधुनिकता यासाठी अजून ८६ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सादरीकरणाद्वारे सीएमआरसी कडून मांडण्यात आले.
या अतिरिक्त व्यवस्थेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक गुणवत्ता कोल्हापुरी चप्पलला मिळणार असून यामधून मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास सीएमआरसी कडून यावेळी व्यक्त करण्यात आला. अतिरिक्त आवश्यक निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवेगळ्या मशीन खरेदी करण्याचे यामध्ये प्रस्तावित आहे. यावेळी महिला व बालविकास मंत्री यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी बोलून या प्रस्तावावर लवकरच चर्चा करून मान्यता देण्याच्या आश्वासनही दिले. मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित महिलांबरोबर संवाद साधत चप्पल तयार करण्यासाठीचा कालावधी, महिन्याचे उत्पन्न, युनिटचा वापर सुरू केल्यावर होणारे भविष्यातील बदल याबाबत चर्चा केली.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाचा आढावा मंत्री अदिती तटकरे यांनी घेतला. माविम अंतर्गत सुरु असणाऱ्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प लोकसंचलीत साधन केंद्रामार्फत राबविला जातो. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे, उपजीविका विकास करणे, महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणे आणि बँकेकडून कर्ज मिळवून देणे, महिलांना रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करिता विविध विभागासोबत समन्वय साधून सहाय्य मिळवून देणे आहे.
माविम कोल्हापूर कार्यालयाचे कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर २२९६ इतके महिला बचत गट झाले आहेत. त्यामाध्यमातून ३२ हजार १६० महिलांचे संघटन करण्यात आले आहे . कोल्हापूर जिल्ह्यामधील महिला बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता विविध बँकांच्या बरोबर महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करार करण्यात आले आहे. आज अखेर एकूण १८० कोटी रुपये कर्ज महिला बचत गटांना विविध बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे.
या बैठकीदरम्यान कोल्हापुरी चप्पल प्रकल्पाचा विशेष आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना कोल्हापुरी चप्पल ही आपली पारंपरिक ओळख असून नवतेजस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून या उद्योगास आधुनिक रूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. प्रकल्पासाठी आवश्यक निधी देण्याबाबत पालकमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी केले. माविम पुणे विभागाचे व्यवसाय विकास सल्लागार सिद्धराम माशाळे तसेच माविम कोल्हापूर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.