निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव
schedule25 Jan 25 person by visibility 286 categoryदेश

नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विविध श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू होत्या. याप्रसंगी केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या नेतृत्वात राज्याने निवडणूक व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करून निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली. त्यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आज त्यांचा सन्मान करण्यात आला. मतदारांच्या सहभागात वाढ करून त्यांचा मतदानाचा अनुभव अधिक सुलभ होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे विशेष कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यांनाही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
याशिवाय मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक संजय यादव यांना मतदान केंद्रांवरील विविध सुविधांचा दृष्टीकोन ठेवून विधानसभा निवडणुकांचे सुरळीत संचालन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना मतदान केंद्रांचे व्यापक सुसुत्रीकरण, प्रशिक्षणाची अंमलबजावणी आणि ई-व्होटिंगच्या माध्यमातून यशस्वी निवडणूक आयोजन केल्याबद्दल गौरविण्यात आले.