राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule02 Jan 26 person by visibility 59 categoryराज्य
🔸९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन
🔸डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक भाषांबाबत निर्णय
सातारा : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मराठी भाषेची सक्ती असेल; मात्र इतर कोणत्याही भारतीय भाषेची सक्ती केली जाणार नाही. इतर भाषा ऐच्छिक असतील. यासंदर्भात अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, तिचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर, जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ कादंबरी वाचताना आपल्या विचारविश्वावर खोल परिणाम झाल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठी मातीशी प्रामाणिक राहून इतिहास, समाज आणि माणूस केंद्रस्थानी ठेवणारे साहित्य निर्माण होणे हीच मराठी साहित्याची खरी ओळख आहे. वारकरी साहित्य, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या योगदानाचा गौरव करताना संत तुकाराम महाराजांचे विचार आणि 'शब्देचि रत्ने' ही परंपरा आजही समाजाला दिशा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेला प्रशासकीय दर्जा दिला, याची आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, आता मराठीच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. मात्र केवळ दर्जा मिळवणे पुरेसे नसून मराठीला व्यापक लोकमान्यता मिळवून देणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जेएनयू’सारख्या संस्थांमध्ये मराठी अध्यासन सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साहित्य निर्मिती ही समाजाच्या जाणिवा विस्तारण्यासाठी असते. त्यामुळे टीका आणि गौरव या दोन्हींतून सुधारण्याचा मार्ग शोधला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
साताऱ्याच्या साहित्यिक परंपरेचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजवर झालेल्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपैकी सर्वाधिक सहा संमेलनांचे आयोजन सातारा जिल्ह्यात झाले असून, सर्वाधिक १७ संमेलनाध्यक्ष हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र होते.
संमेलनाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा, मावळा फाउंडेशन, सातारा तसेच सहभागी सर्व संस्थांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाच्या उद्घाटक डॉ. मृदुला गर्ग यांनी राष्ट्रीय स्तरावरील मराठी साहित्याचा आढावा घेताना कवी नामदेव ढसाळ, मल्लिका अमर शेख, उर्मिला पवार, शरणकुमार लिंबाळे, विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्या साहित्य व नाटकांचा गौरव केला.
९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात साताऱ्याचा गौरवशाली इतिहास उद्धृत करून मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान आणि आपल्याला लिहते करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणताही असो त्याचा दांडा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असू दे तिचा गोंडा मराठीच असायला हवा, असे सांगतानाच मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्व एसटी बसस्थानके आणि रेल्वेस्थानक येथे वृत्तपत्रविक्रेते आणि पुस्तक विक्रेत्यांना पुन्हा दुकाने द्यावीत. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व तहसीलदारांच्या कार्यालयासमोर माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी अशा सूचना त्यांनी मांडल्या.
डॉ. ताराबाई भवाळकर यांनी त्यांच्या कार्यकाळातील अनुभव कथन करताना, मराठी भाषा अधिक व्यापक होत असल्याचे सांगितले. गावखेड्यातील मुले मराठीत लेखन करत असून, गावोगावी साहित्य संमेलनांचे आयोजन होत असल्याचे चित्र आश्वासक आहे. ग्रामीण भागातही नवीन लेखक, प्रकाशक तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन दिल्यास मराठीचा खऱ्या अर्थाने विकास होईल. प्रत्येकालाच आपल्या भावना अभिव्यक्त होता येत नाहीत. त्या व्यक्त करत मी फक्त समूह मनाचा आवाज झाले, असेही त्या म्हणाल्या.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साहित्य संमेलनामागील भूमिका स्पष्ट करताना, शतकपूर्व साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होत असलेले हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मराठी साहित्य चळवळीचा आढावा घेत कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी साहित्य महामंडळ ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोदी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात संमेलनाची सविस्तर माहिती दिली. साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.





