कोल्हापुरात अतिक्रमणांविरोधात महापौरांचा एल्गार...
schedule06 Apr 26 person by visibility 162 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर: "माझं शहर, माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहराच्या प्रगतीसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आयोजित 'जनता दरबार' मध्ये बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांनी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करून येत्या १५ दिवसानंतर शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका मोहीम राबवेल असा इशारा दिला आहे.
रंकाळा परिसरात महापालिकेने धडक कारवाई करत तब्बल १७ खाऊ गाड्यांवर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्पष्ट केले की, यापुढे कोल्हापूर शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. विशेष म्हणजे, प्रशासकीय कारवाईत कोणत्याही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
"अतिक्रमण हा शहराच्या प्रगतीमधील मोठा अडथळा आहे. ज्या व्यावसायिकांच्या गाड्या किंवा दुकाने अतिक्रमणामध्ये आहेत, त्यांनी १५ दिवसांच्या आत ती स्वतःहून काढून घ्यावीत. अन्यथा, त्यानंतर महानगरपालिकेकडून अत्यंत कडक मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येतील ," असा थेट इशारा महापौर निकम यांनी दिला आहे.