‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवर
schedule28 Nov 26 person by visibility 164 categoryआरोग्य
◼️रुग्णांची भेट घेत आरोग्य यंत्रणेला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे ‘जीबीएस’ (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या विनिता सागर भोगम यांनी तत्काळ ॲक्शन मोडवर येत गावातील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या आजाराबाबत कोणतीही भीती न बाळगता व अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना भोगम म्हणाल्या की, जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या वतीने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी हात-पायांना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे, पायांमध्ये अचानक कमजोरी येणे, चालताना तोल जाणे किंवा चालण्यास त्रास होणे, हात-पायांची तसेच चेहऱ्याच्या स्नायूंची ताकद कमी होणे आणि गिळताना किंवा श्वास घेताना त्रास होणे यांसारखी लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी व हात नियमितपणे साबणाने धुवावेत. पिण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि गरम केलेले पाणी वापरावे. तसेच, अन्नपदार्थ स्वच्छ, ताजे व पूर्ण शिजवलेले खावेत आणि बाहेरचे जंक फूड खाणे कटाक्षाने टाळावे. कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे घेणे टाळून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वेळेत औषधोपचार सुरू करावेत, असे सांगण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना भोगम यांनी कळंबा गावातील आरोग्य उपकेंद्र पूर्ण क्षमतेने आणि सर्व आवश्यक प्राथमिक सोयी-सुविधांसह सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी देखील हे उपकेंद्र सुरू ठेवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी करवीरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मस्के, कळंबा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पाटील, कणेरीचे आरोग्य सहाय्यक अनिल पोवार यांच्यासह कळंबा उपकेंद्राचे आरोग्य सेवक श्रेयश पुजारी, सागर चव्हाण, अभिजीत काटकर, आरोग्य सेविका पद्मावती पाटील, प्रभादेवी कर्णिक, आशा गटप्रवर्तक व आशा सेविका उपस्थित होत्या.