कोल्हापूर : अतिक्रमण आणि नागरी प्रश्नांवरून स्थायी समिती सभेचे कामकाज रोखले; जोपर्यंत कारवाईचे उत्तर नाही, तोपर्यंत कामकाज नको; सदस्यांचा आक्रमक पवित्रा
schedule27 Nov 26 person by visibility 121 categoryमहानगरपालिका
◼️दोन दिवसांत पॅचवर्क आणि अतिक्रमणांवर जप्तीची प्रशासनाची ग्वाही
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज अतिक्रमणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सदस्य चांगलेच आक्रमक झाले. "मागील सभेत विचारलेल्या प्रश्नांवर काय कारवाई केली, याचे उत्तर मिळेपर्यंत पुढील कामकाज घेऊ नये," अशी ठाम भूमिका सदस्यांनी घेतल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस कारवाई न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी दिल्यानंतर प्रशासनाने कार्यवाहीची ग्वाही दिली.
◼️अतिक्रमण आणि फेरीवाल्यांच्या प्रश्नावर खडाजंगी
सभेच्या सुरुवातीलाच सदस्या अर्चना पागर यांनी सर्किट हाऊस येथील भाजी मंडई आणि तावडे हॉटेल ते कावळा नाका रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. सायबर चौक ते एनसीसी ऑफिस रोडवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल अभिजीत मोकाशी यांनी केला. तर, फेरीवाल्यांना त्यांच्या बायोमेट्रिक कार्डनुसार नेमून दिलेल्या ठिकाणीच बसवावे, अशी मागणी अमर समर्थ यांनी केली. यावर प्रशासनाने स्पष्ट केले की, यापूर्वी दोनदा कारवाई करून पापाची तिकटी येथील दोन कार्डधारकांना कसबा बावडा मंडईत हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत, आज पुन्हा साहित्य जप्तीची कारवाई केली जाईल.
◼️राजारामपुरीतील बांधकाम परवानग्या रोखण्याची मागणी
शहरातील अनेक भागांत ड्रेनेज लाईन नसून राजारामपुरीमध्ये व्यावसायिक इमारती व अपार्टमेंट्स वाढल्याने जुन्या ड्रेनेज लाईनवर ताण येत आहे. त्यामुळे चोकअप आणि मैला वाहण्याचे प्रमाण वाढले असून, नवीन लाईन टाकेपर्यंत येथील बांधकाम परवानग्या थांबवाव्यात, अशी मागणी प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली. यावर ड्रेनेज विभागाने बांधकाम एनओसी देताना सविस्तर अभिप्राय द्यावा, असे ठरले. तसेच परिख पूल येथील पादचारी पुलासाठी रेल्वे खात्यास ७३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव डीपीडीसीकडे पाठवला असून, केंद्राचा ओव्हर ब्रिज मंजूर झाल्यास हा पूल रद्द होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दाखल्यांचा विलंब आणि पाणी कनेक्शनचा खर्च
क्यूआर कोडमुळे जन्म-मृत्यू दाखल्यांची मागणी वाढली आहे. जुने १४ लाख दाखले पोर्टलवर अपलोड केले असले तरी जिल्हा परिषदेच्या मंजुरीसाठी एकच लॉगिन असल्याने विलंब होत आहे. आता नवीन तीन लॉगिन मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली. दुसरीकडे, अमृत योजनेच्या नवीन लाईनवर पाणी कनेक्शन घेण्याचा खर्च नागरिकांवर लादला जात असून नवीन रस्ते पुन्हा खोदले जातील, असा मुद्दा अमर समर्थ यांनी मांडला.
◼️सभेतील इतर महत्त्वाचे मुद्दे आणि प्रशासनाची उत्तरे:
* रस्ते आणि खड्डे: देवकर पाणंद व मनोरमा नगर रोडवरील पॅचवर्क दोन दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच इव्हेंटसाठी भाड्याने दिलेल्या मैदानांवरील खड्डे न बुजवल्यास कारवाई केली जाईल (पूर्वा राणे).
* स्मशानभूमी कमान व डिजिटल स्क्रीन: पंचगंगा स्मशानभूमीची कमान सीएसआर निधीतून उभारली जाईल. शासनाच्या योजनांच्या माहितीसाठी मुख्य इमारत व चारही विभागीय कार्यालयांत डिजिटल स्क्रीन लावण्यात येतील (अनुराधा खेडकर).
* ट्रॅक्टर निविदा व वसुली: वर्कशॉपच्या हलगर्जीपणामुळे ट्रॅक्टरची किंमत ९२ हजारांनी वाढल्यास जबाबदार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी अभिजीत मोकाशी यांनी केली. यावर जुन्याच दरात निविदा येईल, असे प्रशासनाने सांगितले.
* अधिकारी वाहने व पदोन्नती: १० वर्षांहून अधिक जुनी वाहने असल्याने अधिकाऱ्यांना वाहतूक भत्ता दिला जात असून बुम व टँकर खरेदी केले जातील. अभियंत्यांच्या पदोन्नतीचे आदेशही लागू केले जात आहेत (प्रतापसिंह जाधव).
* कचरा आणि पाणी नियोजन: मार्केट यार्डातील कचरा रस्त्यावर टाकल्याप्रकरणी यार्डाला नोटीस बजावली जाईल (राजनंदा महाडीक). मे महिन्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
* शिवाजी मार्केट भाडे: शिवाजी मार्केटमधील गाळेधारकांचे सन २०१५ ते २०२० दरम्यानचे वाढीव भाडे कमी करून २०२१ ते २०२५ च्या शासन निर्णयानुसार आकारावे, अशी सूचना सभापती विशाल शिराळे यांनी केली.