‘केआयटी’च्या सीडीसी कमिटीवर मोहन घाटगे, चंद्रशेखर डोल्ली; सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी स्विकारला पदभार
schedule12 Oct 24 person by visibility 489 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या अत्यंत महत्वाच्या ५ वर्षाचा कार्यकाळ असणाऱ्या नूतन ‘महाविद्यालय विकास समिती’ची (सीडीसी - कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी) ची बैठक नुकतीच झाली. बैठकीची सुरवात संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या प्रास्ताविकाने झाली. नूतन सदस्य म्हणून सन्माननीय उद्योजक मोहन घाटगे, चंद्रशेखर डोल्ली, शिक्षण तज्ञ म्हणून विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी, बेळगावीचे रजिस्ट्रार डॉ.रंगास्वामी यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ. डी.जी.साठे, डॉ. समीर नागटिळक ,प्रा.शितल वरूर ,डॉ.सई ठाकूर ,प्रा अमोल सावंत तर शिक्षकेतर प्रतिनिधी म्हणून विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्तांच्या हस्ते या सर्व नूतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या बैठकीस मागील कार्यकाळातील सदस्य व्ही. एम. देशपांडे, डॉ बी.एम.हिर्डेकर, शिक्षक प्रतिनिधी डॉ. वाय. एम. पाटील, प्रा संजय लिपारे,डॉ.दिपाली जाधव ,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. विजय पाटोळे हेही उपस्थित होते. या सर्वांच्या गेल्या पाच वर्षातील संस्थेच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाबद्दल विश्वस्तांच्या व संचालकांच्या हस्ते आभार मानण्यात आले.
केआयटीचा उद्योग जगताशी असलेला ‘कनेक्ट’ हा अत्यंत वाखाणण्यासारखा असल्याचे मत माजी उद्योजक सदस्य व्ही.एम. देशपांडे यांनी व्यक्त केले. ‘इंटर्नशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उद्योग जगताशी झालेली ओळख व त्यातून त्यांना मिळालेले प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत नूतन उद्योजक सदस्य मोहन घाटगे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्याच्या ‘प्लेसमेंट’ साठी महाविद्यालयाने करत असलेले प्रयत्न, परदेशी भाषा, करिअर डेव्हलपमेंट साठी घेत असलेले विशेष परिश्रमांचे कौतुक डॉ.बी.एम.हिर्डेकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर परिसर हा फाउंड्रींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाविद्यालयाने ‘धातू अभियांत्रिकी’ (मेटलर्जी) या विषयात विशेष अभ्यासक्रम सुरू करावा अशा प्रकारची सूचना नूतन उद्योजक सदस्य चंद्रशेखर डोल्ली यांनी केली. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे सकारात्मक योगदान मिळू शकते त्यामुळे माजी विद्यार्थ्यांशी मोठ्या प्रमाणात संपर्क ठेवावा अशा प्रकारची सूचना बैठकीत करण्यात आली. केआयटीच्या ४१ वर्षांच्या दर्जेदार शिक्षणाच्या प्रवासात आपल्यासारख्या अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभलेले आहे असेच मार्गदर्शन,सहकार्य आगामी काळातही सर्व नवीन सदस्यांकडून मिळेल अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी व्यक्त केली.
बैठकीनंतर सर्व सन्माननीय सदस्यांनी महाविद्यालयातील आधुनिक आयडिया लॅब, महाविद्यालयातील इतर अन्य विभाग, शैक्षणिक सुविधा यांना भेट देऊन महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.या बैठकीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले देखील उपस्थित होते.