ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य : गणेश लोखंडे; विद्यापीठातील ई- कंटेंट निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन
schedule29 Jan 25 person by visibility 211 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययन करणे अपरिहार्य असणार आहे. यासाठी ई- कंटेंट निर्मितीवर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन मुंबई येथील महास्वयंम ऑनलाइन कोर्सचे प्रशिक्षक गणेश लोखंडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन केंद्र आणि एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा योजने अंतर्गत 'डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ ई- कन्टेन्ट फाॅर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स' कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
गणेश लोखंडे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वयं, महास्वयंम या ऑनलाइन कोर्स बाबत माहिती दिली. तसेच ई-कंटेंट निर्मितीसाठी आवश्यक घटकांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना या क्षेत्रात येणाऱ्या काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र पवार यांनी शिवाजी विद्यापीठ ई- कंटेंट निर्मितीसाठी सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक दूर शिक्षण व ऑनलाईन विभागाचे प्र- संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.
दुसऱ्या सत्रात सायबर इन्स्टिट्यूटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र परीजात यांनी ई- कंटेंट निर्मितीचे विश्लेषण करताना डिजिटल मीडिया कंटेंट, फिल्म कंटेंट, न्यूज कन्टेन्ट आदीची प्रात्यक्षिकाद्वारे मांडणी केली. या सत्राचे अध्यक्ष डॉ. कृष्णा पाटील होते. दोन्ही सत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
यावेळी एम. ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, उप-कुलसचिव व्ही. बी. शिंदे, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. अविनाश भाले, डॉ. राहुल चित्रकार, डॉ. किशोर खिलारे, जयप्रकाश पाटील, रवींद्र खैरे तसेच विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, मास कम्युनिकेशन व बी. ए. फिल्म मेकिंगचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन रणदिवे यांनी केले तर आभार नाझिया मुल्लानी यांनी मानले.