सिद्धगिरी निर्मित गोमय गणेश ही लोकचळवळ करू या ' : यशोवर्धन बारामतीकर यांचा निर्धार
schedule11 Sep 25 person by visibility 235 categoryसामाजिक

कोल्हापूर : पूजनीय स्वामी काडसिद्धेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे पाण्यात विरघळणारी आणि पाणी शुद्ध करणारी सिद्धगिरी कणेरी मठ निर्मित गोमय गणेश ही आगामी काळात लोकचळवळ स्वरूपात विकसित करू, समाजातील विविध घटकांचे प्रबोधन करून त्यामध्ये सक्रिय सहभाग वाढवू, असा निर्धार मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानंतर सिद्धगिरी कणेरी मठाच्या गोमय गणेशाच्या थेट विक्री व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शहरासह विविध भागांतील कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. त्यांच्या मते जाणून घेत त्यांचे अनुभव समोर आले.
बैठकीदरम्यान प्रारंभी महादेव शिर्के यांनी सर्वांचे स्वागत केले आणि गणपती निर्मितीशी संबंधित विविध माहिती व अनुभव शेअर करत कार्यकर्त्यांना पुढे येण्याचे आवाहन केले.
वारणा कोडोली येथिल माऊली गोशाळेचे संचालक समाधान पाटील यांनी गाव व तालुका पातळीवरील प्रशासकीय अधिकारी, विविध पक्ष व संघटनांतील मान्यवर यांचा सहभाग घेऊन गोमय गणेशाबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे यांनी गोमय गणेशाच्या फॉर्म्युल्याचे प्रशिक्षण शाळांमध्ये देण्याची आवश्यकता सांगितली. विद्यार्थ्यांना त्यामागील शास्त्रीय माहिती समजावून सांगावी, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्नेह मेळावे आयोजित करावेत, अशी सूचना केली.
सुशांत टक्कळकी यांनी प्रिंट, वेब व ऑनलाईन माध्यमांतून व्यापक प्रचार करून सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला.
निवेदिका सीमा मकोटे यांनी महिला बचत गटांसाठी प्रात्यक्षिके आयोजित करून गोमय गणेशामुळे होणारे फायदे, पर्यावरणपूरक उपयोग आणि वर्षभर आयोजित होणाऱ्या प्रदर्शनांत सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या सर्व सुचनांचा आढावा घेत मुख्य कार्यकारी अधिकारी बारामतीकर यांनी दिवाळीनंतर पूजनीय काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या समवेत आगामी वर्षासाठी नियोजन व मार्गदर्शनासाठी व्यापक मिंटीग घेण्याची घोषणा केली. यावेळी जाधव गुरुजी, महेश मास्तोळे, पुष्पा बारामतीकर यांनीही विविध सूचना केल्या . सुधाकर लंबे यांनी आभार मानले.