रगेडियनतर्फे कोल्हापुरात शनिवारी 'मिडनाईट सायकल राईड'; फिट इंडिया अभियानांतर्गत आयोजन
schedule27 Nov 26 person by visibility 59 categoryक्रीडा
कोल्हापूर : निरोगी आरोग्य, तंदुरुस्त शरीर आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी 'रगेडियन' संस्थेतर्फे कोल्हापुरात एका अनोख्या 'मिडनाईट सायकल राईड'चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या 'फिट इंडिया' अभियानांतर्गत शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार असून, रगेडियन शाहूपुरी जिम येथून या राईडचा प्रारंभ होऊन रंकाळा जिम येथे सांगता होणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या आणि भ्रमणध्वनीच्या (मोबाईल) अतिवापराच्या जीवनशैलीतून थोडा वेळ काढून नागरिकांनी नियमित व्यायामाला प्राधान्य द्यावे, सायकलिंगची आवड जोपासावी आणि निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ही केवळ सायकल राईड नसून सामाजिक बांधिलकीतून आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
'फिट कोल्हापूर'च्या या चळवळीत शहरातील युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, हौशी सायकलप्रेमी तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन रगेडियनच्या वतीने करण्यात आले आहे.