पी. एम. सूर्यघर योजनेत केडीसीसी बँकेसह कागल तालुका देशात एक नंबर आणूया; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
schedule05 Jun 26 person by visibility 159 categoryराज्य
◼️कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात
कागल : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे वीजबिल शून्यावर आणण्याचा ध्यास घेऊन केडीसीसी बँक पी. एम. सूर्यघर मोफत वीज अभियानासाठी अर्थसाहाय्य करणार आहे. या अभियानामध्ये असे काम करूया की, केडीसीसी बँकेसह कागल तालुका सबंध देशात एक नंबर आला पाहिजे. या कामगिरीबद्दल दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी केडीसीसी बँक, माझा व तालुक्यातील सर्व बहाद्दर कार्यकर्त्यांचा सत्कार करतील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मतदार याद्यांच्या पुनर्नरीक्षण मोहिमेमध्ये सतर्क रहा. एकही पात्र मतदार यादी बाहेर वंचित राहता कामा नये, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या.
पी. एम. सूर्यघर योजना, मतदार यादी पुनरिक्षण, मोफत हृदयरोग तपासणी मोहीम, विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप, पदवीधर मतदार नोंदणी आढावा या विषयांच्या अनुषंगाने घेतलेल्या कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व्यापक मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात मुश्रीफ पुढे म्हणाले, मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत सतर्क रहा. मॅपिंग होऊन नाव पात्र यादीमध्ये असले तरीसुद्धा सही करून फॉर्म भरून द्या. एस. आय. आर. मोहीम गांभीर्याने घ्या. सतर्क रहा, एकदा वेळ निघून गेली की पुन्हा येणार नाही याची जाणीव ठेवा.
◼️बहीण योजनेबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. सुमारे 60 लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. संबंधित महिलांनी केवायसी पूर्ण केल्यास पुढील महिन्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल.
◼️गोकुळ चेअरमन महायुतीचाच......!
मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव यायला लागलेले आहेत. आपापल्या गावातील जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने कसे होतील, यासाठी अहोरात्र कष्ट करा. हे ठराव एकत्रित सादर केले जाणार आहेत. त्यावेळी त्या कार्यालयात मीही उपस्थित असणार आहे. सबंध जिल्ह्यामध्ये कागल तालुक्याचे ठराव जास्त होतील आणि राष्ट्रवादीचे ठराव उच्चांकी होतील यासाठी प्रयत्न करूया. गोकुळ निवडणुकीच्या संदर्भाने काही गोष्टी झाल्या असतील, त्या विसरून जाऊन एकदिलाने कामाला लागूया. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत, महायुतीचाच चेअरमन होईल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगतील त्याप्रमाणे पॅनेलची रचना होईल.
◼️माझा म्हशींचा गोठा.......!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मी कोणावरी टीका करणार नाही. परंतु; माझ्या नावाने असलेल्या संस्थांच्या नावावरून टिका आणि आरोप प्रत्यारोप झाले. या ८५ संस्था काही मी एका घरात काढलेल्या नाहीत. आमच्या नावाने संस्था काढू नका, असे मी कार्यकर्त्यांना सांगत होतो. परंतु; त्या संस्था गावागावातील लोकांनी प्रेमापोटी आमच्या नावाने काढलेल्या आहेत. एखाद्या माणसाबद्दल प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असल्याशिवाय लोक अशी नावे देत नाहीत. तब्बल 50 म्हशींचा माझा गोठा आहे. अडीचशे लिटर दूध संघाला जात होते. परंतु; तीव्र उन्हाळ्यामुळे दूध कमी झाले आहे. आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढायची असेल तर अशी टीका करताना सर्वांनी संयम राखावा.
◼️त्याग आणि कष्ट आठवून संयम पाळा......!
मुश्रीफ म्हणाले, 30-35 वर्षे जनतेची सेवा करून आम्ही मोठे झालेलो आहोत. गावपातळीवरून काम करीत करीत मंत्री पदापर्यंत पोहोचलो आहोत. २४ तास गावात राहून जनतेसाठी खपत आलो आहोत. या वयात आजही सकाळी साडेपाचपासून उठून मी जनतेसाठी उपलब्ध असतो. मी जनतेसह कार्यकर्त्यांना आणि जनतेनेही मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपले आहे. गोरगरीब जनतेसाठी आम्ही केलेला त्याग आणि कष्ट याचा विचार करून बोलताना संयम पाळा. परमेश्वराच्या आशीर्वाद आणि जनतेचे पाठबळ जोपर्यंत पाठीशी आहे तोपर्यंत माझा केसही वाकडा होणार नाही.
◼️हृदयरोग तपासणी अभियान राबविणार.....
हृदयरोग हा गंभीर आजार असून त्याचे वेळेवर निदान होणे आवश्यक आहे. यासाठी घराघरात जाऊन मोफत हृदय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. अवघ्या आठ मिनिटांत तपासणीचा अहवाल मिळणार असून, वेळेत उपचार केल्यास हृदयरोगावर नियंत्रण मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यासाठीचे चष्मे उपलब्ध झाले असून त्यांचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, मुश्रीफ साहेब कमी बोलतात, मात्र शांतपणे आणि प्रभावीपणे काम करतात हे वेळोवेळी दिसून आले आहे. पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने कागल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. पदवीधर मतदार नोंदणी पुन्हा नव्याने सुरू झालेले आहे या नोंदणी मध्ये सक्रिय सहभाग घ्या प्रताप उर्फ भैया माने यांच्या रूपाने कागल तालुक्यातून दुसरा आमदार होणार आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष तुरबतमठ, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, रंगराव पाटील, मनोज फराकटे, प्रवीण भोसले, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. तानिया मुजुमदार, इम्रान अन्सारी आणि प्रणव सुतार यांनी हृदय तपासणी उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन (SIR) मोहिमेबाबत माहिती दिली. महावितरणचे कार्यकारी अभियंता बनगे यांनी सूर्यघर योजनेची सविस्तर माहिती देत नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
स्वागत विकास पाटील- कुरुकलीकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. संजय चितारी यांनी आभार मानले.