नीट परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
schedule05 Jun 26 person by visibility 83 categoryराज्य
मुंबई: मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'नीट' परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. परीक्षार्थींसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण निर्मितीवर मुख्यमंत्र्यांनी भर दिला असून, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि सायबर सुरक्षेसाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. उमेदवारांची ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा पसरू नयेत म्हणून समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करावी आणि संभ्रम निर्माण झाल्यास तातडीने खुलासा करावा.
विशेषतः पुणे आणि लातूर येथील केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. या बैठकीत 'एनटीए'चे महासंचालक अभिषेक सिंह यांनी परीक्षा नियोजनाचे सादरीकरण केले. राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.