गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ
schedule12 Feb 26 person by visibility 78 categoryराज्य
कोल्हापूर : गंभीर आजाराने त्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक पाऊल म्हणून जिल्ह्यात पेलिएटिव्ह (उपशामक) केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पेलिएटिव्ह केअर समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील व डॉ. प्रविण नाईक यांच्या माध्यमातून या सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात 10 स्वतंत्र पेलिएटिव्ह केअर बेडची व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. गडहिंग्लज व इचलकरंजी येथील जिल्हा उपरुग्णालयात आठवड्यातून एक दिवस विशेष तज्ञ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे मानसोपचार तज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि फिजिशियन यांच्या माध्यमातून उपचार दिले जाणार आहेत.
जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना या सेवेचा लाभ दिला जाणार आहे. कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, एएलएस, एड्स तसेच उपचाराने पूर्ण बरे न होणाऱ्या आजारांनी त्रस्त रुग्णांचे गट A (तीव्र), गट B (मध्यम) आणि गट C (सौम्य) असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. गट A मधील रुग्णांपर्यंत सेवा प्राधान्याने पोहोचविण्यात येईल.
या रुग्णांना वेदना, मानसिक तणाव, नैराश्य, श्वास घेण्यास त्रास, भूक मंदावणे, मळमळ व अशक्तपणा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पेलिएटिव्ह केअर अंतर्गत आजारावर उपचारासोबतच वेदना नियंत्रण, मानसिक आधार, सामाजिक सेवा व आध्यात्मिक समुपदेशन देऊन रुग्णांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही समुपदेशन केले जाईल.
डॉक्टर, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व समुपदेशकांची तज्ञ टीम या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. समितीमार्फत रुग्ण नोंदणी, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता, वेदनाशामक औषधसाठा, गावपातळीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व सेवा पारदर्शकपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सामुदायिक आरोग्य अधिकारी व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही सेवा गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियमित भेटी देऊन तपासणी, औषधोपचार व समुपदेशन करतील. यामुळे रुग्णांना वारंवार रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होऊन कुटुंबीयांनाही आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.
जिल्ह्यात सुरू होत असलेली ही पेलिएटिव्ह केअर सेवा गंभीर रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.