अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजना
schedule12 Feb 26 person by visibility 104 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र शासनाकडून रस्ते अपघातग्रस्तांना सुवर्ण तासात (Golden Hour) तातडीने वैद्यकीय मदत मिळावी आणि मदत करणाऱ्या नागरीकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने राह-वीर योजना राबविण्यात येत आहे.
देशात रस्ते अपघात ही गंभीर सामाजिक व आर्थिक समस्या असून देशामध्ये दरवर्षी सुमारे 10 टक्के वाहनसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर अपघात व मृत्युची संख्या सुध्दा वाढत आहे. या पार्श्वभुमीवर अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करणे, समाजात मानवतेची भावना वाढविणे व जनतेस प्रेरणा देऊन निरपराध जीव वाचविण्यास प्रवृत्त करणे, असा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीने मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीस अपघातानंतर एका तासाच्या आत (Golden Hour) रूग्णालयात पोहोचवून त्याचा जीव वाचविण्यास मदत केली आहे, अशी व्यक्ती ही राह-वीर म्हणून पात्र ठरते. मोटार वाहन कायद्यातील कलम 2 (12 A) नुसार अपघातानंतरचा एक तास हा सुवर्ण तास असून या कालावधीत योग्य वैद्यकीय उपचार दिल्यास अपघातग्रस्तांचा मृत्यु टळण्याची शक्यता जास्त असते.
या योजनेंतर्गत अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीस मदत करणाऱ्या राह-वीरास प्रत्येक घटनेसाठी 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य (पुरस्कार) रक्कम दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक पुरस्कारासोबत प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. यामध्ये एका अपघातात एक किंवा एकापेक्षा अधिक पीडितांचा जीव वाचविल्यास 25 हजार रुपये पुरस्कार, एका पीडितासाठी एकापेक्षा अधिक राह-वीर असल्यास 25 हजार पुरस्काराचे समान वाटप करण्यात येणार आहे. तसेच एका व्यक्तीस राह-वीरास वर्षातून जास्तीत जास्त 5 वेळा पुरस्कार देण्यात येईल. तसेच या योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरूनही दरवर्षी देशभरातील सर्वोत्तम 10 राह-वीरांना प्रत्येकी 1 लाख रुपये व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मुल्यमापन समिती (Appraisal Committee) स्थापन केली आहे. या समितीमध्ये पोलीस अधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधिकारी व उप/प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य असतील.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अपघातग्रस्तास एखाद्या राह-वीराकडून रूग्णालयात भरती केल्यानंतर, त्याबाबत पोलीस विभागाने डॉक्टरांकडून खातरजमा करून त्या राह-वीरास पोचपावती (Acknowledgement) दिली जाईल, त्यानंतर अशा अर्जाची पडताळणी आणि मंजूर प्रक्रिया ही जिल्हास्तरीय मुल्यमापन समितीकडून करून प्रस्ताव परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडे पाठविल्यानंतर पुरस्कार रक्कम ही राह-वीर यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येईल.
मोटार वाहन कायद्यातील कलम 134 (A) नुसार राह-वीरास पोलीस किंवा न्यायालयीन त्रासापासून कायदेशीर संरक्षण असून अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या व्यक्तीस पोलीस स्टेशनला जबरदस्तीने बोलविले जाणार नाही, तसेच राह-वीरास आपली ओळख गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे.