पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule22 Jul 25 person by visibility 241 categoryराज्य

▪️ दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घेणार आढावा
▪️एसटीपी, ड्रेनेज लाईन, पम्पिंग स्टेशनच्या कामात विलंब आढळल्यास संबंधितांवर कारवाई
▪️इंदौरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न
▪️प्लॅस्टिक बंदीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवा; जनजागृतीवर भर द्या
▪️रंकाळ्यातील जलचरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा
▪️पर्यावरणपूरक गणेशोत्सवात अधिकाधिक नागरिक सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा
कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात सुरु असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ड्रेनेज लाईन आणि पंम्पिंग स्टेशनसह पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत व गतीने पूर्ण करा. या कामांमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना देऊन सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणांना वेळोवेळी भेटी देऊन सद्यस्थितीचा अहवाल दर महिन्याला जिल्हा प्रशासनाला सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही शहरातील व जिल्हा परिषद क्षेत्रातील एसटीपी, ड्रेनेज लाईन, पम्पिंग स्टेशनच्या कामात विलंब आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले नदी प्रदूषण कमी होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा वेळोवेळी घेण्याच्या दृष्टीने यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात येईल. तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी भेटी देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. तसेच संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत वेळोवेळी बैठका घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.
पंचगंगा प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपाययोजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा, या कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्या. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले.
सांडपाणी प्रक्रिया सनियंत्रणासाठी उभारण्यात येणारे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत विहित कालावधीत पूर्ण व्हायला हवेत. तसेच औद्योगिक क्षेत्र व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याबाबत ऊस गाळप करण्यापूर्वी, गाळप सुरु असताना व गाळप पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी बैठका घेऊन कडक सूचना द्या. त्याचबरोबर अटी व नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा. सद्यस्थितीत सुरु असलेल्या संयुक्त सांडपाणी प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शून्य निकसन (झेड एल डी) प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करा.
प्लॅस्टिक बंदी प्रभावीपणे होण्यासाठी सर्व आस्थापना, दुकाने, शाळा, धार्मिक स्थळे, बसस्थानके आदी सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक बंदी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा तसेच व्यापक जनजागृती करा, अशा सूचना देऊन इंदौरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना श्री. येडगे यांनी दिल्या.
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाची प्रवेशद्वारे आकर्षक व सुशोभित करा. त्याचबरोबर रंकाळ्यातील जलचरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गणेशोत्सवा दरम्यान राबवण्यात येणाऱ्या उपायोजनांमध्ये आणखी सुधारणा करुन यात नागरिकांचा प्रतिसाद गतवर्षीपेक्षा जास्त मिळण्यासाठी प्रयत्न करा, असेही येडगे यांनी सांगितले.
दोन्ही महानगरपालिका, प्रदूषण विभाग, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती बैठकीत दिली.