नामदेवरायांचे प्रतिभाशाली अभंगधन
schedule22 Jul 25 person by visibility 276 categoryसामाजिक

आषाढ वद्य त्रयोदशी (२२ जुलै): संतशिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त...
संत नामदेवरायांच्या जीवनाची सगळी परिमाणेच अलौकिक होती. त्यांचा एकुणच जीवनप्रवास पाहिला तर प्रथमपासून शेवटपर्यंत त्यांच्या जीवनाला एक प्रकारची भक्तिमय लय होती. टाळमृदंगाच्या आणि वीणा चिपळ्यांच्या तालावर विठ्ठलाच्या नामघोषात बेहोषीने नाचणारे संतशिरोमणी नामदेव महाराजांचे अवघे जीवन विठ्ठलमय झाले होते. संत नामदेवांच्या व्यक्तिगत जीवनात विठ्ठलभक्तीशिवाय कांहीच बाकी राहिले नव्हते. त्यांच्या जीवनाची क्षितिजसीमा पारलौकिकाला वेढून उरली होती. कीर्तन रंगात देहभान विसरून नाचणाऱ्या संत नामदेवांनी पांडुरंगाला आपलासा केला होता. स्वतःला लाभलेले हे भाग्य सर्वांनाच लाभावे यासाठी ते आसुसलेले होते. देवाला नाना प्रकारे आळवून त्याच्या सहवासाची रसगोडी ते प्रत्यक्ष अनुभवीत होते. समाजातील जनांनी याच पांडुरंग भक्तीची कास धरली तर ते उध्दरुन जातील, म्हणून त्यांनी पंढरीच्या समृद्ध वाटेने जावे असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणून ते आयुष्यभर विठ्ठल भक्तीचा मुक्तपणे अभंगगंध उधळत होते.
याच विठ्ठल भक्तीच्या तळमळीतून त्यांना जे अभंग स्फुरले ते मराठी वाङ्मयाच्या दरबारात मानाचे पान ठरले आहेत.संत नामदेवांनी भागवत संप्रदायाच्या प्रसाराचे विशाल कार्य करुन ठेवले आहे.
संत नामदेवांच्या अभंग वाङ्मयात आजच्या मराठी वाङ्मयाचे अनेक प्रवाह आढळतात. नामदेवांच्या प्रतिभेचे अलौकिकत्त्व त्यांच्या अभंगवाणीत जाणवल्यावाचून रहात नाही. अंतःकरणातील भक्तीच्या उमाळ्यातून नामदेवाचे अभंग स्फुरलेले आहेत. नामदेवाच्या मनात भक्तिभावना तीव्रतेने दाटून आली होती. मनाच्या तळमळीतून नामदेवांचे अभंगधन निर्माण झाले. मनात निर्माण होणारे अस्फुट भावतरंग आणि तीव्र भावनांचे कल्लोळ नामदेवांनी आपल्या अभंगातून प्रभावीपणे रेखाटले आहेत.
त्यांचे अभंग हे नामदेवांनी मनापासून अनुभवलेल्या भावस्थितीचे तीव्र पडसाद आहेत. आशयानुरूप उत्कट शब्दांनी साकारलेली ही अभंगवाणी असून तेच आजच्या स्फुट भावकवितेचे बीज आहे. नामदेवांनी आत्मनिष्ठ भावनेतून अभंग रचले आहेत. आत्मनिष्ठ अभंगाप्रमाणेच वस्तुनिष्ठ अभंग
नामदेवांनी रसाळपणे गायिले आहेत. कथाकाव्ये, आख्याने, चरित्रे, आत्मचरित्रे,प्रवासवर्णने, कृष्णकथा व रामकथा वगैरे विषय त्यांच्या अभंगाचे स्वरुप आहे. समकालीन संतांची चरित्रे सुध्दा त्यांनी आपल्या अभंगातून गायिली आहेत. दशावतार वर्णन, हरिश्चंद्र आख्यान,श्रेयाळाख्यान, ध्रुवाख्यान यासारखी सरस आख्याने त्यांनी रचली आहेत. आपल्या लौकिक आणि पारलौकिक जीवनप्रवासाची विविध वळणे नामदेवांच्या अभंगवाणीतून प्रत्ययाला येतात.
आपल्या जीवाचा सखा ज्ञानेश्वर ह्यांचे चरित्र, तीर्थावली आणि समाधी अशा स्वरुपात त्यांनी अभंगरचना केली आहे. आपल्या आत्मोन्नतीचा कळस गाठल्यावर इतर लोकांना दिव्यत्वाचा लाभ व्हावा या तळमळीने केलेला उपदेश नामदेवाच्या अभंगातून दिसून येतो... नामदेव संसारिकांना, मुमुक्षूंना, साधकांना देवाच्या दिशेने जाण्यास आपल्या अभंगातून सांगतात. दुष्ट, लबाड लोकांना ते आपल्या अभंगातून चांगलेच फटकारे मारतात. आपल्याला आलेले विलक्षण आध्यात्मिक अनुभव आपल्या अभंगातून सादर करतात. लोकवाङ्मयातून ते अध्यात्माचे निरूपण करतात. भूपाळ्या आणि आरत्या रचतात. नामदेवांचे काव्यकर्तृत्व अलौकिक आहे. संतांची चरित्रे आपल्या अभंगातून गाणारे नामदेव ज्ञानेश्वरांच्या चरित्रवर्णनात विरघळून जातात. 'नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ।।' असे ते स्वतःची अनुभूती अभंगातून मांडतात. ईश्वरी साक्षात्काराच्या अनुभूतीतून त्यांचे अभंग निर्माण झाले आहेत. देवाच्या भेटीसाठी तहानलेले त्याचे अभंग आहेत. साक्षात्काराच्या प्रचितीसाठी त्यांचे मन भक्तिवेडे झालेले दिसून येते. नामदेवांची सारी भावसृष्टी अभंगातून साकार झालेली आहे. देवाच्या स्पर्शाने इंद्रियांच्या जाणिवेपलिकडचा दिव्य अनुभव त्यांना प्राप्त झाला होता. हा दिव्यानुभव पेलताना त्यांची अवघी इंद्रिये धन्य झाली होती. नामदेव आता जगाकडे जनी जनार्दन ह्या भावाने पाहात होते. त्यांना विलक्षण दैवी सामर्थ्य प्राप्त झाले होते. देवाचा धावा ते मोठ्या तीव्रतेने करत असताना त्यांचे अभंग पराभक्तिने नटलेले असतात. 'आडखळूनी दुडदुडा येई आता ।
भोजना बैससी येथे येई विडा धावत दुडदुडा येई आता । नामा म्हणे सुखी लक्ष्मीचा हा चुडा । धावत दुडदुडा येई आता ।' अशा प्रकारे त्यांचे अभंग जीवनाला भक्तिचे परिमाण देऊन जातो. अभंगातून देवाचे गुणवर्णन करता करता नामदेवांची समाधी लागते. नामदेवांच्या साऱ्या उत्कंठेचे, प्रतिक्षेचे, तळमळीचे येथे सार्थक झालेले दिसून येते. दिव्यज्ञान प्राप्त होऊन देखील देवाच्या सगुण रूपाचे त्यांच्या मनाला वेध लागतात. सर्वगुणमंडित पंढरीच्या वाळवंटातले ते सावळे मोहक रुपच नामदेवांना वेड लावते. त्या विटेवरच्या काळ्या सावळ्या मूर्तीच्या दर्शनासाठी ते वेडेपिसे होतात,
अवघ्या चराचर सृष्टीत हे देवाचे सावळेपण कोदादून राहिलेले ते अनुभवतात. 'पाहिला पाहिला माझा पांडुरंग । जीवा जिवलग डोळे भरी। नामयाची जणी भुकेली ते घाली । आनंद दिवाळी आजि झाली ।' माझा चक्रपाणी माझा चक्रपाणी असे ज्याला त्याला सांगत नामदेव सगुण साकार रुपाला पुन्हा पुन्हा लोटांगण घालतात. निर्गुण ईश्वरांची प्रचिती मनोमन अनुभवूनसुद्धा सगुण रुपाच्या दर्शनाचा मोह नामदेवांना सोडवत नाही. नामदेवांची ज्ञानोत्तर भक्ती आणि त्यांची सगुण भक्ति अगदी अवर्णनीय असते. नामदेवाची अभंगसंपदा आपल्याला भगवंताच्या दर्शनाची ओढ लावीत असते. वारकरी संप्रदायाचे एक निष्ठावंत प्रचारक म्हणून त्यांचे स्थान फार वरचे आहे. संत नामदेवांच्या भावनात्मक अनुभवाचे स्वरुप व पातळी आणि आवाका फार मोठा विलक्षण आहे. ईश्वरी साक्षात्कार ह्या सगळ्या अनुभवांचा गाभा आहे. ईश्वराची डोळस भक्ती ही त्यांच्या अभंगातील मूळ प्रवृत्ती आहे. नामदेवाच्या जीवनात सर्व थरावरचे अनुभव अभंगातून साकार झाले आहेत. नामदेवाचा प्रत्येक अभंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने उजळलेला आहे. नामदेव चरित्राना जास्त महत्त्व आहे. मराठीतील ते आद्य पद्य चरित्रकार आहेत. आपल्या भक्तिमय भावनांचा आविष्कार नामदेव
लोकसंग्राहक व्यक्तिमत्त्व नामदेवानी चांगल्या प्रकारे रेखाटले आहे. नामदेवाची ज्ञानदेवावर उत्कट श्रद्धा होती. उलट ज्ञानदेव नामदेवाच्या संगतीचे भुकेले होते. नामदेव आपल्या एका अभंगात म्हणतात, 'सर्वांभूती दया सर्वभावे करुणा । जेथे मी तू पणा मावळला । भजन तया नाव वाटे मज गाडेच येर ते काबाड वायावीण । नमन ते नम्रता न देखे गुणदोषा अंतरी प्रकाश आनंदाचा ।।' स्वतःच्याच जीवनाकडे जेव्हा अलिप्तपणाने पाहता येते तेव्हा आत्मचरित्र निर्माण होते. पाश्चिमात्य साहित्यात आत्मचरित्राचे महत्त्व फार आहे. भारतीय संस्कृती मुळातच 'स्वत्वाचा' विसर पाडणारी आहे. इथल्या साहित्यिक संतांना स्वतःच्या जीवनाविषयी प्रत्यक्षपणे काही सांगावे असे वाटत नाही. तरी पण आपल्या विविध भावस्थितीचे चित्रण नामदेवांनी आपल्या अभंगातून केले आहे. नामदेवांच्या आत्मचरित्रात | पांडुरंग हे चालते बोलते पात्र आहे. शिष्यांच्या कुळात त्यांचा जन्म झालेला असला तरी ते | रात्रंदिवस पांडुरंगाच्या भक्तीत रमलेले होते. सदगुरु विसोबा खेचरांनी केलेला गुरुपदेश आणि त्यामुळे दृष्टीला लाभलेले व्यापकपण या साऱ्या जीवनप्रवासाचा मागोवा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक अभंगातून घेतला आहे. अवघ्या जीवनभर अंतरंगात घुमत राहिलेले विठ्ठलाचे नामस्मरण त्यांच्या अभंगातून उफाळून आले आहेत. नामदेवाचे अभंगातून व्यक्त होणारे आत्मनिवेदन अत्यंत प्रामाणिक आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्याविषयी काय वाटते ह्याचे मनोहर दर्शन त्यांनी अभंगातून घडविले आहे. हा नरदेह दुर्लभ आहे, मोठ्या सायासाने मिळाला आहे. तेव्हा त्याचे चीज करा. संधी आहे तोवर जीवनाचे सार्थक करुन घ्या. कार्याचा परिणाम संचितावर होतो असे ते आपल्या अभंगातून परखडपणे सांगतात. संत नामदेवांनी आपल्या अभंगवाणीतून अवघ्या विश्वाला मानवतेची शिकवण प्रदान केली आहे.
✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)