कागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेते
schedule19 Apr 26 person by visibility 99 categoryराज्य
कागल :येथील डी. आर. माने महाविद्यालयात १९ एप्रिल रोजी अनुज चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रवीण सुतार व श्रीनय पालनकर यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.
९ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १३ वर्षांवरील (खुला) अशा तीन गटांत ही स्पर्धा पार पडली. एकूण ५ राऊंड्समध्ये झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटातून २५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेच्या निकालानुसार, ९ वर्षांखालील गटात पार्थ सुतार याने प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रीनय पालनकर, कृष्णराज चव्हाण, अंशराज चव्हाण आणि शौर्य कांडेकरी यांनी अनुक्रमे द्वितीय ते पाचवा क्रमांक मिळवला. याच गटात कैवल्या चव्हाण हिला उत्कृष्ट विद्यार्थिनीचा मान मिळाला.
१३ वर्षांखालील मध्यम गटात शिवम साबळे याने विजेतेपद मिळवले, तर वरद चौगुले, शौर्य पाटील, शिवराज फडतारे आणि अंश निंबाळकर यांनी यश संपादन केले. शरयू कांडेकरी ही या गटात उत्कृष्ट विद्यार्थिनी ठरली. १३ वर्षांवरील खुल्या गटात ओजस व्हनमाने याने प्रथम, तर सोहम चौगुले याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच रणवीर पुनुगडे व स्वरा सुतार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून अनुज चेस अकॅडमीचे प्रशिक्षक व जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर जिल्हा चेस असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील, मोहन कांडेकरी, रणजीत चव्हाण, बाबूराव पाटील आणि प्रवीण सुतार यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, डॉ. श्रीनिवास पाटील आणि प्रो. संग्राम तोडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.