पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यापीठातर्फे पथनाट्यातून जनजागृती
schedule26 Aug 25 person by visibility 160 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागामार्फत “पर्यावरणपूरक गणेशोत्सव” या विषयावर विविध ठिकाणी सादरीकरण आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले.
हा जनजागरण उपक्रम कोल्हापूर शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये उत्साहाने राबविण्यात आला. त्यात कोल्हापूर पब्लिक स्कूल, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, गोखले कॉलेज, विवेकानंद कॉलेज, राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली या संस्थांचा सहभाग होता.
अधिविभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘गेले गणपती कोणीकडे?’ हे पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मातीच्या मूर्तींचा वापर, प्लॅस्टिक सजावट व थर्माकोलचा वापर टाळणे, प्लॅस्टिकच्या ताट-ग्लासाऐवजी पुन्हा वापरता येणाऱ्या भांड्यांचा वापर करणे, डॉल्बी व लेझर शोमुळे होणारे प्रदूषण टाळणे यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींविषयी प्रबोधन करण्यात आले. पारंपरिकतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचे मूल्य जपणारा गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
अधिविभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सोनल चोंदे आणि डॉ. पल्लवी भोसले यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.