कर भरणे ही समाजसेवा आहे; सर्वांनी तो अवश्य भरला पाहिजे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
schedule10 Apr 25 person by visibility 289 categoryसामाजिक

▪️महावीर जयंती निमित्त 'महावीर स्वामी जन्म कल्याणक' महोत्सव
▪️पुढील मार्च पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन : केंद्रीय मंत्री पियुष गोयल
मुंबई : अर्थसंकल्प जाहीर झाला की बहुतांशी लोक व व्यापारी वर्ग आयकराबद्दल बोलत असतात. आपण कर भरला नाही तर देशाच्या सीमेवरील जवानांची काळजी घेता येणार नाही तसेच रस्ते – महामार्ग बांधणे इत्यादी जनहिताची कामे करता येणार नाही. प्रामाणिकपणे कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य आहे तसेच कर भरणे ही समाजसेवा आहे, त्यामुळे सर्वांनी कर अवश्य भरला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
महावीर जयंती निमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे आयोजित ‘महावीर स्वामी जन्म कल्याणक’ महोत्सव राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत योगी सभागृह मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मृत्यू अटळ आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. भौतिक सुखाला कधीही सीमा नसते. कितीही पैसे कमवा, घरे बांधा, बँक ठेवी जमा करा, परंतु त्यामुळे समाधान होणार नाही. त्यामुळे जीवन समाजासाठी व लोकसेवेसाठी व्यतीत केले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
जैन धर्माने शाकाहारी जीवनपद्धतीला महत्व दिले आहे. शाकाहारी भोजनामुळे मनुष्याचे विचार परिवर्तन होते याचा आपण व्यक्तिशः अनुभव घेतला आहे असे सांगून सन २००० साली आपण संपूर्ण शाकाहारी झाल्यापासून आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
एके काळी तामिळनाडू राज्यातील दोन तृतीयांश लोक भगवान महावीरांची शिकवण पाळत होते. तामिळ भाषेतील पाच महाकाव्यांपैकी दोन महाकाव्ये जैन मुनींनी लिहिली आहेत असे सांगून जैन धर्माचा देशाचा जनमानसावर मोठा प्रभाव असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणे देखील महत्त्वाचे असते असे सांगितले. केंद्र शासनाच्या प्रयत्नामुळे अतिरेकी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण होत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा विडा उचलला असून पुढील वर्षी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल असे त्यांनी सांगितले. देशातील १६० जिल्ह्यांपैकी आज केवळ १२ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
दिनांक ९ एप्रिल रोजी विश्व नवकार महामंत्र दिवस साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल संवर्धन, मातेच्या नावाने वृक्षारोपण, स्वच्छतेचा पुरस्कार, स्थानिक उत्पादनांना चालना, देश भ्रमण, नैसर्गिक शेती, निरामय जीवनशैली, योग व खेळाचा पुरस्कार व गोरगरिबांची मदत ही नवसूत्री दिली असे सांगून ही नवसूत्री देशाला समृद्ध करेल असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी आचार्य नयपद्मसागर यांनी मुंबईतील १५०० सार्वजनिक शाळांना नवसंजीवनी देऊन तेथील लाखो गरीब मुलांना मोफत भोजन, शिक्षण, कौशल्य शिक्षण व संस्कार देण्याचा संकल्प सोडला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंडळ संस्थेच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त काढलेला ‘जैन जगत’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
कार्यक्रमाला जैन साध्वी प्रियंवदा, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, भारत जैन महामंडळ संस्थेचे अध्यक्ष सी सी डांगी, माजी अध्यक्ष तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.