मूल्यांची जपणूक हीच यशाची गुरूकिल्ली : डॉ. आनंद देशपांडे
schedule11 Dec 24 person by visibility 163 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : व्यक्तीगत आयुष्यामध्ये मूल्यांची जपणूक हीच यशाकडे घेऊन जाणारी गुरूकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर ही मूल्ये जपावीत, असे आवाहन पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. आनंद देशपांडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे एमबीए युनिट, संगणकशास्त्र अधिविभाग आणि तंत्रज्ञान अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. देशपांडे यांचे ‘ऑपॉर्च्युनिटीज् फॉर दि इंडस्ट्रीज इन दि एज ऑफ डिसरप्टीव्ह टेक्नॉलॉजी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. आनंद देशपांडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची पंचसूत्री सांगितली. ते म्हणाले, विविध प्रकारच्या तंत्रज्ञानांनी मानवाला आता दीर्घायुष्य प्रदान केले आहे. परिणामी चांगले आयुष्य जगण्यासाठी दीर्घकाळ आपल्याला कार्यरतही राहावे लागणार आहे. तंत्रज्ञानातील गतिमान बदल हे संभ्रमित करून टाकणारे असले तरी त्यांच्या आधारेच आपल्याला आयुष्याची वाटचाल यशस्वी करायची आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. येत्या दशकभरात ती तिसऱ्या क्रमांकावर असेल. या लाटेवर नव्या पिढीला स्वार होऊन यश मिळवायचे असेल, तर मोठी स्वप्ने पाहायला शिकले पाहिजे. पुढील पाच-दहा वर्षांमध्ये आपल्याला काय साध्य करावयाचे आहे, ते ठरवून वाटचाल करायला हवी. सध्या सारे बदल गतीने होत आहेत. त्यामुळे सातत्यपूर्ण शिक्षण-प्रशिक्षणाला पर्याय नाही. सतत नवनवीन गोष्टी शिकून त्यांच्या आधारे अधिक पुढे जायला हवे. त्याचप्रमाणे नेटवर्किंग हे सुद्धा आयुष्यात महत्त्वाचे आहे. चांगल्या व्यक्ती, माणसे, संस्था यांच्याशी, त्यांच्या उपक्रमांशी जोडले जायला हवे. त्यातून चांगल्याचा विस्तार होतो आणि त्याचा आपल्याला लाभही होतो. माणसाने आपली स्वतःची मूल्यव्यवस्था विकसित करावी आणि त्या मूल्यांशी प्रामाणिक राहावे. ही मूल्येच आपल्या यशाची गुरूकिल्ली ठरतात. त्याचप्रमाणे उपरोक्त सर्व बाबींत तुम्ही किती ‘पर्सिस्टंट’ राहता, सातत्य राखता, यावरही यशाची कमान अवलंबून राहते.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्याला पुढे काय करावयाचे आहे, कोण बनावयाचे आहे, हे निश्चित करून आतापासूनच त्या दिशेने वाटचाल सुरू करायला हवी. आपले ध्येय जितके लवकर निश्चित करू, तितक्या लवकर वाटचाल सुरू करणे शक्य असते. त्यामुळे डॉ. देशपांडे यांनी सांगितलेल्या पंचसूत्रीनुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू करण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अधिक संवादी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचेही समाधान केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व परिचय वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाचा डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले, तर डॉ. कविता ओझा यांनी आभार मानले. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, एमबीए युनिट संचालक डॉ. दीपा इंगवले, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. प्रवीणकुमार पाटील यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.