निरंतर व औपचारिक शिक्षणासाठी पंजाबराव देशमुख यांचा आग्रह : डॉ. अशोक राणा
schedule10 Apr 25 person by visibility 245 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : औपचारिक शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांसाठी लोक विद्यापीठाची स्थापना व्हावी अशी इच्छा पंजाबराव देशमुख यांची होती त्यासाठी त्यांनी निरंतर शिक्षणाचा आग्रह धरला. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून वंचित व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे द्वार खुली केली असे प्रतिपादन डॉ. अशोक राणा यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित फुले- शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक कार्य व विचार' या विषयावर आयोजित व्यख्यानात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरु डॉ. पी एस पाटील उपस्थित होते.
डॉ. राणा म्हणाले, पंजाबराव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपले कार्य पुढे चालू ठेवले. डॉ. पंजाबराव देशमुख यांची देशाचे कृषिमंत्री व एक नेते म्हणून ओळख सर्वश्रुत आहे परंतु, ते एक संशोधक होते याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले आहे. पंजाबराव देशमुख यांनी प्राचीन भारतीय इतिहासाच्या अनुषंगाने वैदिक साहित्याचे केलेली संशोधन कार्य अत्यंत मोलाचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर कार्य केले. गाडगे महाराजांनी त्यांनी सुरु केलेल्या विद्यार्थी वासतिगृहाच्या कार्यात मदत केली. तर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंजाबराव देशमुख यांनी केलेले सहकार्य महत्त्वाचे आहे. पंजाबराव देशमुख यांनी त्या काळात केलेल्या सूचनेचे पालन केले असते तर आज जे काही इतर मागासवर्गीय समाज घटकांच्या आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सुटले असते.
या व्याख्यानाचे आयोजन ऑनलाईनरित्या करण्यात आले व शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व कार्य केंद्रांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री अविनाश भाले, सुशांत पंडित, विक्रम कांबळे इत्यादी उपस्थित होते.