पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिनाभरात ५३ लाख ८२ हजाराची वसुली
schedule18 Sep 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
◼️६५ थकबाकीदार नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभाग वसुली पथक तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने चार उपद्रव शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. थकीत पाणीपट्टी वसुली तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दि. १८ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत महापालिकेच्या या पथकांमार्फत एकूण ५३ लाख ८२ हजार ८१८ रुपयांची पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे.
या कालावधीत थकीत पाणीपट्टी असलेल्या ६५ नळ कनेक्शनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच शहरातील ६ अनधिकृत नळ कनेक्शनवरही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी चार स्वतंत्र वसुली पथके कार्यरत असून या पथकांकडून थकीत पाणीपट्टीधारकांशी संपर्क साधून थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संबंधितांनी थकबाकी न भरल्यास नियमानुसार नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळ कनेक्शनधारकांना दि. 12 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आपले कनेक्शन अधिकृत करून घेण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत कनेक्शन अधिकृत करून न घेतल्यास संबंधितांवर महासभा ठरावानुसार 25 हजार रुपये दंड तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या नळ कनेक्शनची पाणीपट्टी नियमितपणे भरावी. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन घेऊ नये अथवा अनधिकृत जोडणी आढळल्यास ती तत्काळ नियमित करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त नागेंद्र मुतकेकर, परितोष कंकाळ जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपद्रव शोध पथक व पाणीपट्टी वसुली विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.