साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
schedule01 Aug 24 person by visibility 355 categoryसंपादकीय
🟣 गुरुवार, १ ऑगस्ट: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांचा विशेष लेख...
साहित्य निर्मितीसाठी विशिष्ट वातावरण लागते, उच्च शिक्षण लागते, असे अनेक समज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी चुकीचे ठरविले. या महान लोकशाहीराला केवळ दीड दिवस शाळेत जाण्याचा योग आला. मात्र त्यांनी सुमारे ४० कादंबर्या लिहिल्या. त्यांच्या कथा, कादंबर्यांवर अनेक मराठी चित्रपट निर्माण झाले. त्यांच्या शाहिरी पोवाड्यांनी जनसामान्यांवर पकड घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी लढणार्या स्त्रियांना आपल्या कथा, कादंबरीमध्ये नायिका बनविले. 'कलेसाठी कला' हा दृष्टिकोन त्यांनी नाकारला. 'जीवनासाठी कला' याची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केली. कथा, कादंबर्या, शाहिरी, राजकीय समिक्षा, लावण्या, पोवाडे आदी साहित्य प्रकार त्यांनी लीलया हाताळले. आपल्या साहित्यातून समाजाचे वास्तव चित्रण त्यांनी रेखाटले. अण्णाभाऊंनी त्यांची शाहिरी समाज परिवर्तनासाठी व जन जागृतीसाठी वापरली. जनतेच्या लोकलढ्यासाठी त्यांनी आपली धारदार लेखणी तलवारीसारखी सातत्याने तळपत ठेवली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे मुख्य सेनानी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी 'मुंबईची लावणी’ लिहिली. ’माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली’ ही त्यांची लावणी त्या वेळी खूप गाजली. लावणी म्हंटले की त्यामध्ये शृंगारिक शब्दांची रेलचेल असते. मात्र अण्णाभाऊंनी लावणीचा चेहरा-मोहरा पार बदलून टाकला. ’माझी मैना गावाकडं राहिली”या लावणीत मैना हे रूपक मुंबई प्रांतासाठी होते आणि ही मुंबई जर महाराष्ट्राला मिळाली नाही तर मराठी भाषिकांच्या जीवनाची काहिली होणार आहे असा आशय या लावणीतून त्यांनी मांडला. त्यांची वाणी व लेखणी सतत जनतेच्या लढ्यासाठी प्रवृत्त करते.
फकिरा, माकडीचा माळ, संघर्ष, वैजयंता अशा अनेक गाजलेल्या कादंबर्या त्यांनी लिहिल्या. फकिराची अनेक भाषांत भाषांतरे झालीत. वैजयंता, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, फुलपाखरू या कादंबर्यांतून दलित स्त्रीचे होणारे लैंगिक शोषण व दारिद्रयामुळे शरीर विक्रीसाठी होणारी मजबुरी तसेच रूढी-परंपरेच्या नावावर दलित स्त्रीच्या वाट्याला आलेले शोषण अण्णाभाऊंनी अतिशय मार्मिक शब्दांत रेखाटले. मराठी कादंबरीला नायिकाप्रधानतेचा दिलेला नवा आयाम, पारंपरिक तमाशाचे लोकनाट्यात केलेले रूपांतर, कलापथकाला क्रांतीचे बनविलेले हत्यार व धारदार लेखणी तसेच त्यांची तडाखेबंद शाहिरी महाराष्ट्राच्या मराठी मनामनात आजही घर करून राहिली आहे. जग बदलण्याची ताकद त्याच्या गीतातून व्यक्त होत होती. म्हणूनच हे जग घाव घालूनच बदलावे लागेल, असा विचार त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वरील लिहिलेल्या कवनात मांडला. ते म्हणतात.’जग बदल घालूनी घाव, सांगून गेले आम्हा भिमराव’.
"पृथ्वी ही शेषाच्या फणीवर उभारलेली नसून श्रमिकांच्या व कष्टकर्यांच्या तळहातावर उभारलेली आहे." अशी कष्टकर्यांसाठी व श्रमजीवींच्या प्रतिष्ठेसाठी आपली वाणी व लेखणी झिजविणार्या तसेच जगातील विषमतेवर, स्त्री व दलित शोषणावर उच्चवर्गीयांच्या अन्याय, अत्याचारावर व राजकारणातील पुढार्यांच्या दांभिकतेवर प्रखरपणे प्रहार करणार्या या लोकशाहीराला भारतरत्न देऊन गौरविण्यात आल्यास आपले मराठी साहित्य सातासमुद्रापार केलेल्या या थोर साहित्यिक, कलावंत, तमासगीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानीला समस्त भारतीयांच्या वतीने मानवंदना दिली जाईल.
✍️ डॉ. सुनिलकुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)