सातारा : महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा वीस वर्षीय पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांच्याकडून ६४वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज पाटीलने पुण्याच्या हर्षद कोकाटेचा पराभव करत गादी विभागातून अंतिम फेरीत विजय मिळवला होता. तर, विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखला १३-१९ अशा गुण फरकाने हरवत माती विभागातून अंतिम लढतीत प्रवेश केला होता.
कोल्हापूरला कुस्तीची पंढरी मानली जाते. मात्र गेली २१ वर्षे कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला नव्हता. मात्र २० वर्षांच्या पृथ्वीराज पाटीलने ही प्रतीक्षा संपवत कोल्हापूरकरांना हा मान मिळवून दिला.
कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पृथ्वीराज पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळला आहे. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे हे त्यांचे मूळ गाव आहे. कोल्हापूरच्या जालिंदर आबा मुंडेंच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला आहे. पुण्यात आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये त्याची तयारी अमर निंबाळकर आणि राम पवार यांनी करून घेतली. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे