🟠 सुजित चव्हाण, रवींद्र माने जिल्हाप्रमुख; राजेश क्षीरसागर आणि खासदार धैर्यशील माने यांनी केली घोषणा
कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सुजित रामभाऊ चव्हाण आणि इचरकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्या नावाची घोषणा हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, आणि करवीर विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण यांची निवड झाली. हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघानुसार इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली. खासदार माने आणि राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या नियुक्तीची पत्रे दोघांकडे सपू्र्त केली.
सुजित चव्हाण हे यापूर्वी शिवसेना शहर उपप्रमुख होते. आता त्यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी इचरकरंजी नगरपालिकेचे तीन वेळा नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच मराठा महासंघाचे ते प्रमुख कार्यकर्ते आहेत.
शिवसेनेतील फुटी नंतर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणी नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या आदेशानुसार यापुढे जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि विधानसभा मतदारसंघानुसार पदाधिकाऱ्यांची घोषणा पुढील आठ दिवसात केली जाईल अशी राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सुजित चव्हाण म्हणाले, जिल्हाप्रमुख हे पद मोठे असून एक जबाबदारी म्हणून जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार केली जाईल.
पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, जयवंत हरुगले, किशोर घाटगे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.