शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको..!
schedule13 Mar 25 person by visibility 255 categoryसामाजिक

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, कृषी औद्योगिक प्रगत महाराष्ट्राचे उद्गाते बाळासाहेब देसाई, ज्येष्ठ इतिहाससंशोधक, अथक परिश्रम व दूरदृष्टीने शिवाजी विद्यापीठाची पायाभरणी करणारे, शिक्षणतज्ज्ञ बॅरिस्टर आप्पासाहेब पवार, राजर्षी शाहू महाराज तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कृतीशील वैचारीक वारसदार तसेच पुरोगामी चळवळीतील खंदा बुरुज प्रा. डॉ. एन.डी.पाटील, यांनी अत्यंत कल्पकतेने व दूरदृष्टीने विचार करून देशाच्या कानाकोपऱ्यात, जगभरातील शिक्षण क्षेत्रात छत्रपती शिवरायांच्या नावाचा सातत्याने जागर व्हावा, म्हणून जाणिवपूर्वक कोल्हापूर येथील विद्यापीठास 'शिवाजी विद्यापीठ'
हे नाव देण्याचा आग्रह धरला व विद्यापीठाच्या स्थापनेवेळी तो कृतीत ही आणला.
अलीकडच्या काळात दर पांच दहा वर्षांनी, "शिवाजी विद्यापीठाचे नामांतर करावे व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ " असे नाव द्यावे, अशी मागणी काही संघटना व संस्था करीत आहेत. ही मागणी चुकीची व शिवप्रेमींची दिशाभूल करणारी आहे.
कोल्हापूरच्या विद्यापीठाला 'शिवाजी विद्यापीठ' हे नाव का असावे, याची सांगोपांग व सविस्तर चर्चा शिवाजी विद्यापीठाचे स्थापनेवेळीच झालेली आहे, याकरिता शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सी. रा. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नामकरण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांशी विचार विनिमय करून 'शिवाजी विद्यापीठ' असे नाव कसे योग्य आहे, याचा परामर्श घेतला होता. सरनाईक, साळुंखे, मंडलिक, भोसले-हवालदार, जगदाळे या भुमिपुत्रांनी छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती चिरंतन रहाव्यात म्हणून आपल्या जमिनी विनामूल्य शिवाजी विद्यापीठाचे उभारणीसाठी दिल्या आहेत,त्यांचा ही आग्रह 'शिवाजी विद्यापीठ' असे नामकरण व्हावे असाच होता. याचाही विचार त्यावेळी झाला आहे.
अर्थात बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाची ओळख एम.एस. विद्यापीठ अशी झाली आहे, तर मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे 'एसएनडीटी महिला विद्यापीठ' असे नाव प्रचलित झाले आहे, यासारख्या अनेक संस्थांची मुळ नांवें बाजूला पडली आहेत व त्यांना लघू नावांनी (शाॅर्टटायटल) ओळखले जात आहे; अलिकडे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय व्ही.टी.रेल्वे स्टेशनचे नामांतर करून 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असे नाव देण्यात आले आहे, मात्र त्यास सर्रास महाराष्ट्रातील मराठी माणूस सुध्दा " सी. एस.टी." या नावाने संबोधू लागला आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नाव सर्रास " वाय.सी. एम.यू."असे घेतले जाते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले तर त्याचे" सी. एस.एम.यू "असे सर्वत्र संबोधले जाईल. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या शैक्षणिक स्मारकाचा उद्देश सफल तर होणारच नाही, शिवाय तमाम शिवप्रेमी जनतेच्या अस्मितेला धक्का पोहोचणार आहे.
नामविस्ताराचा पाचदहा वर्षे गेली की, सातत्याने उकरून काढून काही संघटना सामाजिक उद्रेक घडविण्यासाठी कटीबद्ध आहेत. त्यांचे छत्रपती शिवरायांच्या वरील पुतना मावशीचे प्रेम शिवभक्तांनी वेळीच ओळखून त्यांना पायबंद घातला पाहिजे. त्यामुळे" शिवाजी विद्यापीठ"हेच नाव योग्य असून यामध्ये बदल करू नये.
✍️ डाॅ.सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)