SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्रीपर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरजमाणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात : जिल्हाधिकारी अमोल येडगेपवित्र रमजान ईद: संयम, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा मंगल सोहळाभारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ: सनईचे जादुगार आणि भारतीय संस्कृतीचे दूतऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचना

जाहिरात

 

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरज

schedule21 Mar 26 person by visibility 101 categoryराज्य

 21 मार्च रोजी साजरा होणारा जागतिक वन दिन हा मानव आणि निसर्ग यांच्यातील दृढ नात्याची जाणीव करुन देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड, संवर्धन आणि संगोपन ही गरजेबरोबरच सामूहिक जबाबदारी बनली आहे. पर्यावरणाचा समतोल आणि संतुलन राखण्यासाठी खासगी आणि सामूहिक जमिनींवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन वनांचे प्रमाण वाढवणे, जैवविविधता वाढवणे, टिकवणे आणि संवर्धन करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

▪️राज्यातील वनक्षेत्राची स्थिती
राष्ट्रीय वननीती 1988 नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भागावर वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल व संतुलन राखणे तसेच संवर्धन करणे शक्य होते. महाराष्ट्रात 307 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 61.35 लाख हेक्टर जमीन वृक्षाच्छादित असून हे प्रमाण साधारण 20 टक्के आहे. 
जागतिक तापमानवाढ,  वातावरणीय बदल, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यावरणाच्या संतुलनात आणि जैवसृष्टीच्या स्थिरतेमध्ये (Ecological stability) सातत्याने बदल होत आहेत. पर्यावरणाचे असंतुलन, वाढते प्रदूषण आणि त्यातून होणाऱ्या बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत आहे. या पार्श्वभूमीवर वन व वन्य जीवांचे संरक्षण, संवर्धन व संगोपनासाठी वन विभाग व वन्यजीव विभाग अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे.

▪️जैवविविधतेसाठी सामाजिक वनीकरण 
सामाजिक वनीकरण विभागामार्फत खाजगी आणि सामूहिक जमिनींवर वृक्ष लागवड करून वृक्षाच्छादन वाढविण्याचे काम सातत्याने केले जात आहे. राज्यात त्या त्या क्षेत्रातील  मातीचा स्तर, हवामान आणि पर्जन्यमान यांचा विचार करुन स्थानिक, दुर्मिळ व औषधी वृक्षांची लागवड करण्यात येते. त्याचबरोबर व्यापारी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वृक्ष लागवडीबाबत कौशल्य मिळवून  देण्याचे काम सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने केले जाते. यामुळे जैव विविधता वाढविणे, टिकविणे आणि संवर्धन करणे शक्य होत आहे.

▪️कोल्हापूर सामाजिक वनीकरणाचा रोप लागवडीवर भर
कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिनस्त 10 परिक्षेत्र कार्यालयांमार्फत सन 2025 च्या पावसाळ्यात 49 हेक्टर वनेत्तर क्षेत्रावर 54 हजार 439 रोपांची लागवड करण्यात आली. या रोपांचे संगोपन व देखभाल प्रभावीपणे करण्यात येत असून जिवंत रोपांचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.

▪️लक्षावधी रोपांची निर्मिती  कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागामार्फत सन 2026 च्या पावसाळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोप निर्मिती करण्यात येत आहे. वन महोत्सव कालावधीत विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विविध यंत्रणांना रोपे उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे 9.43 लाख रोपांची निर्मिती केली जात आहे. यात लहान आकाराच्या पिशवीतील 8.35 लाख आणि उंच आकाराच्या पिशवीतील 1.08 लाख रोपांचा समावेश आहे. रोपवाटिकांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा देऊन उत्कृष्ट दर्जाची रोपे तयार केली जात आहेत.

▪️पर्यावरण जनजागृती आणि शिक्षणावर भर
केंद्र शासनाच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 100 हरीतसेना शाळांमध्ये निसर्ग, शाश्वत विकास आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार, प्रसिध्दी आणि जनजागृतीवर विशेष भर दिला जात आहे.

▪️विविध विभागांच्या समन्वयातून  वृक्ष लागवड
वैश्विक तापमानवाढ, ऋतूचक्रातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींच्या वाढत्या प्रमाणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग,  महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांसारख्या विविध विभागांच्या समन्वयातून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. सामाजिक वनीकरण विभाग या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे.

▪️वनीकरणाचे व्यापक कार्यक्रम
रस्ते, कालवे, रेल्वे लाईन यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, टेकड्यांचे हरीतीकरण, सामूहिक पातळीवर वनीकरण कार्यक्रम तसेच ‘अटल आनंद घन वन’, ‘पंचायत वन’, ‘बेल वन’ आणि ‘अमृत वन’ यांसारख्या योजनांद्वारे व्यापक वनीकरण कार्यक्रम राबविले जात आहेत.

▪️लोकसहभागावर विशेष भर
वन महोत्सव योजने अंतर्गत दरवर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते. शासनामार्फत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन दिल्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढत आहे. वृक्ष लागवड आणि संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

▪️पर्यावरण रक्षणासाठी अनेक उपक्रम : वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त रोपांची लागवड व्हावी यासाठी विविध  उपक्रम राबवले जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, शेतीचे बांध, पडीक जमिनीवर रोजगार हमी योजना तसेच अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व फुल पीक लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड केली जात आहे. वनेत्तर क्षेत्र वनाखाली आणण्याच्या उद्देशाने ‘कन्या वन समृद्धी योजना’  राबवण्यात येत असून मुलीच्या जन्मानिमित्त वृक्ष लागवड केली जाते. या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्यावर अशा शेतकरी दांपत्याने शासनाच्या मदतीने मुलीच्या नावे 10 वृक्षांची लागवड केली जाते.

▪️शहरी, ग्रामीण भागात प्रबोधनातून वृक्ष लागवड : हरित महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात “वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना” ही योजना राबवली जात आहे. या संकल्पनेतून ‘शुभेच्छा वृक्ष’, ‘शुभमंगल वृक्ष’, ‘आनंद वृक्ष’, ‘माहेरची झाडी’ आणि ‘स्मृती वृक्ष’ यांसारख्या उपक्रमांद्वारे वृक्ष लागवड ही लोकचळवळ बनविण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वृक्षाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने शहरी व ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांमध्ये इको-क्लब, प्रकल्प कार्य निसर्ग कॅम्पिंग आणि मिशन लाईफ यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत हरित सेना शाळांमध्ये निसर्ग, शाश्वत विकास आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रबोधनपर कार्यशाळा घेतल्या जाताहेत. निसर्ग शिबिरे आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे.

राज्यातील वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग प्रभावी प्रयत्न करत आहे. तथापि, पर्यावरण संवर्धन ही समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असून जास्तीत जास्त झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि वनेत्तर क्षेत्र वनाखाली आणणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल, संतुलन राखण्यासाठी, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी सामाजिक वनीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने “हरित महाराष्ट्र” ही संकल्पना साकारण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होणे  गरजेचे आहे. चला तर मग, वृक्षारोपण करुया आणि पर्यावरणाचा समतोल राखूया... !

लेखन - किशोरकुमार मारुतराव येळे, 
 विभागीय वन अधिकारी, 
सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes