जनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचना
schedule20 Mar 26 person by visibility 96 categoryसामाजिक
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी, तालुका आणि गाव स्तरापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतिशील राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी देशातील खेडी संपन्न बनली पाहिजेत. त्यासाठी जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा, कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श जिल्हा परिषद होण्यासाठी काम करावे, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या कार्यालय प्रवेश प्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा आज कार्यालय प्रवेश झाला. खासदार धनंजय महाडिक आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार महाडिक यांनी नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांचे अभिनंदन केले. तर खासदार धनंजय महाडिक, अध्यक्षा शिल्पा खोत, माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीत, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेश झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी, देशातील खेडी समृद्ध झाली पाहिजेत. गावे समृद्ध होण्यासाठी जिल्हा परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकते. नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन, जनतेच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घ्याव्यात.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करा. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. मिळालेल्या संधीचे सोने करत, कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श बनवण्यासाठी एकदिलाने काम करा, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या. जलजीवन मिशनची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करून, 'हर घर नल से जल' ही मोहीम यशस्वी करावी. विकासाच्या योजनांसाठी निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या कामाचेही खासदार धनंजय महाडिक यांनी कौतुक केले. नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गेली ४ वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होते. प्रशासनाने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही प्रश्न प्रलंबित आहेत. महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून निधी खेचून आणू. लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच, नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवू, असे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी म्हटले.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संचालक संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर, अरुण जाधव, अमोल चव्हाण, एन. डी. वाईंगडे, इंद्रजित पाटील, शिवानी भोसले, सलीम महात, काकासाहेब सावर्डकर, महेश पाटील, प्रशांत महापुरे, कुमार कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.