जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅली
schedule19 Jun 26 person by visibility 151 categoryराज्य
कोल्हापूर : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवार, 23 जून रोजी कोल्हापुरात क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 250 ते 300 खेळाडू या रॅलीत सहभागी होणार असून सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले.
ऑलिम्पिक चळवळीचे जनक पियरे डी कौबर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी ग्रीस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक ऑलिम्पिक डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतात भारतीय ऑलिम्पिक संघ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने 1952 पासून ऑलिम्पिक डे आणि ऑलिम्पिक सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.
ही रॅली मंगळवार, 23 जून रोजी सकाळी 7 वाजता भवानी मंडप येथील कीर्ती स्तंभाजवळ क्रीडा ज्योतीचे पूजन करून प्रारंभ होईल. त्यानंतर भवानी मंडप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज मार्गे शाहू स्टेडियम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.