कोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
schedule17 Jun 26 person by visibility 164 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ आणि २० जून २०२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासनाने अत्यंत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या (Z+ सुरक्षा) नियोजित दौऱ्यात कोल्हापूर विमानतळ, श्री महालक्ष्मी मंदिर, इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेचे उद्घाटन, कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क येथील सभा, शासकीय विश्रामगृह आणि पोलीस परेड ग्राउंडवरील कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनैना पवार हे देखील कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
या व्हीव्हीआयपी दौऱ्यादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कोल्हापूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, ६ अपर पोलीस अधीक्षक, २० पोलीस उप अधीक्षक, ६४ पोलीस निरीक्षक, १४२ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १३८५ पोलीस अंमलदार, ८ क्यूआरटी पथके, ३ आरसीपी प्लाटून, ४०० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या २ कंपन्यांचा समावेश आहे.
दौऱ्याच्या अनुषंगाने हॉटेल, लॉजेस आणि रेकॉर्डवरील संशयित इसमांची तपासणी करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीमधील महत्त्वाचे चौक व मिश्र वस्तीच्या ठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाढवण्यात आले असून रेकॉर्डवरील इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. या दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानंतर काही ठिकाणी वाहतुकीवर अल्प कालावधीसाठी निर्बंध असणार आहेत, तरी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी केले आहे.