SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा 21 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळाकिल्ले पन्हाळगडावर 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोषशिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा; तालशास्त्रातील बारकावे आणि एकल वादनाने विद्यार्थी मंत्रमुग्धडी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते‘गोकुळ’ मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...कोल्हापूर महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादनरमजान : संयम, सेवा, श्रद्धेचा पवित्र महिना...इथे दररोज होतो शिवरायांचा जयघोष!स्वराज्य संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराजडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवड

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा; तालशास्त्रातील बारकावे आणि एकल वादनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

schedule19 Feb 26 person by visibility 86 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय तबला वादन कार्यशाळा उत्साहात झाली. १७ व १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यशाळेत न्यू जर्सी (अमेरिका) येथील सूर्याक्ष देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसिद्ध तबला वादक पं. अरविंद मुळगावकर यांचे ते शिष्य आहेत.

 तालशास्त्रातील बारकावे आणि देशपांडे यांच्या एकल वादनाने उपस्थित रसिक आणि विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सूर्याक्ष देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना काही मूलभूत बोलपंक्ती देऊन त्यांच्याकडून सराव करून घेतला. त्यानंतर तीनताल, झपताल व मत्तताल यांमधील कायदे, रेला, रौ, लडी या संकल्पना सोदाहरण स्पष्ट केल्या. दुसऱ्या सत्रात तिहाईचे विविध प्रकार, तिहाई तयार करण्याची सूत्रे आणि त्यामागील विचारप्रक्रिया यावर प्रकाश टाकला.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात त्यांनी 'कंठसंगीताची साथसंगत' या विषयावर गायन व तबल्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गायक कलाकाराला साथ करताना कोणते तंत्र वापरावे, याचे बारकावे त्यांनी उलगडून दाखवले. यासोबतच दर्जेदार आणि 'फर्माईश गत' या वादन प्रकारांमधील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांचे शंकानिरसन केले.

 देशपांडे यांच्या बहारदार एकल तबला वादनाने कार्यशाळेची सांगता झाली. अतिशय मुलायम पण स्पष्ट बोल, सादरीकरणातील सौंदर्य आणि उत्तम 'पेशकश' ही त्यांच्या वादनशैलीची वैशिष्ट्ये या वेळी अधोरेखित झाली. त्यांनी तीनतालामध्ये पेशकार, कायदे, रेला आणि फरूखाबाद घराण्याच्या विविध बंदिशी सादर केल्या. आपल्या वादनाचा शेवट त्यांनी स्वतः रचलेल्या 'फर्माईशी कमाली चक्रदार'ने केला. सदर वादनासाठी नगमा साथ अमित साळोखे यांनी केली. 
कार्यशाळेला संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. सुधीर पोटे, पं. विनोद डिग्रजकर, डॉ. नंदकुमार जोशी, महेश देसाई, संदीप तावरे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक केले. अतुल परीट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गिरीधर कुलकर्णी व प्रशांत देसाई यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes