SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रमजान : संयम, सेवा, श्रद्धेचा पवित्र महिना...इथे दररोज होतो शिवरायांचा जयघोष!स्वराज्य संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराजडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन

जाहिरात

 

...इथे दररोज होतो शिवरायांचा जयघोष!

schedule19 Feb 26 person by visibility 104 categoryसामाजिक

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कोल्हापुरात १८ नोव्हेंबर १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. तेव्हापासून आजतागायत या सागरमाळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांना नित्यनेमाने अभिवादन करून त्यांच्या नावाचा मनोभावे जयघोष केला जातो.

छत्रपती राजाराम महाराज, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्या प्रेरणेतून आणि स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नांतून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. शिवाजी महाराज यांच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांनी स्थापन केलेल्या आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी द्रष्ट्या नेतृत्वामुळे आधुनिकतेची दिशा लाभलेल्या करवीरनगरीत शिवरायांच्या नावाने विद्यापीठ स्थापन होण्याला वेगळे संदर्भ होते. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांनी तयार केलेला महाराजांचा (चौथऱ्यासह) ३६ फूट ६ इंच उंचीचा आणि आठ टनांचा संपूर्ण ब्राँझमधील पुतळा या विद्यापीठाच्या प्रांगणात १ डिसेंबर १९७४ रोजी बसविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वाधिक देखणे असे हे शिल्प आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांचे हे शिल्प प्रेरणास्रोत ठरले आहे.

 विद्यापीठाच्या प्रांगणात प्रवेश करतानाच महाराजांचे हे भव्य शिल्प अभ्यागताची नजर वेधून घेते. महाराजांना अभिवादन केल्याखेरीज कोणीच आत प्रवेश करीत नाही. विद्यापीठाचे कुलगुरू तसेच अन्य अधिकारी मुख्य प्रशासकीय भवनाकडे येत असताना प्रथम महाराजांच्या या पुतळ्याला प्रदक्षिणा घालतात, अभिवादन करतात आणि मगच कार्यालयात प्रवेश करतात. विद्यापीठातील अनेक शिक्षक, अधिकारी आणि प्रशासकीय सेवकही महाराजांना अभिवादन करून मगच कार्यालयात येतात. इतकेच काय, सकाळी आणि सायंकाळी विद्यापीठात फिरायला येणारे अभ्यागत सुद्धा दिवसातले पहिले अभिवादन महाराजांच्या या पुतळ्याला करून मगच पुढे मार्गस्थ होतात. याशिवाय, जुन्या पुणे-बेंगलोर महामार्गावरून ये-जा करणारे नागरिक, बसमधील प्रवासी हा पुतळा दिसताच नमस्कार करतात. शिवरायांचा हा पुतळा इतका देखणा आणि तेजस्वी आहे की, त्याच्या केवळ दर्शनानेच विद्यार्थ्यांच्या मनात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा आत्मविश्वास जागतो.

विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनेक मुले शहरातील शाळांत शिकतात. त्यांची ने-आण शालेय बस किंवा रिक्षाने केली जाते. हे शालेय विद्यार्थी जाता-येता पुतळ्याचे दर्शन झाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देतात, तेव्हा कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही स्फुरण चढते. कोल्हापूरला येणाऱ्या विविध शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली विद्यापीठास आवर्जून भेट देतात. यावेळी त्यांच्या तोंडूनही महाराजांच्या नावाचा जयघोष केला जातोच. शिवाजी विद्यापीठात अशा प्रकारे केवळ शिवजयंतीलाच नव्हे, तर दररोज नित्यनेमाने शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाते, त्यांचा जयघोष केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या आणि त्यांच्या कार्याच्या स्मृतीलहरींचे तरंग या परिसरात सातत्याने उमटत असतात.

◼️पुतळ्याची मनोभावे स्वच्छता करणारे जनार्दन गवळी
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वीकारण्यास येत असताना प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी आपल्यासोबत मनोहर पाटील नावाचा एक तरुण शिपाई म्हणून आणला होता. महागावकर बंगल्यात विद्यापीठ कार्यालय असतेवेळी तेथे एक मारुती मंदिर आहे. या मारुतीची पूजाअर्चा न चुकता मनोहर पाटील करीत असत. त्यांनाच पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्याचे काम दिले होते. ते अत्यंत निष्ठेने व भक्तिभावाने महाराजांच्या पुतळ्याची निगराणी करीत असत. ते नोकरीत पुढे हवालदार झाले; पण, सेवानिवृत्त होईपर्यंत रोज आंघोळ झाल्याबरोबर न चुकत पुतळा धुणे, अष्टगंध, फुले वाहून महाराजांची पूजा करुन त्यांना वंदन करुनच त्यांची पुढील दिनचर्या सुरू व्हायची. हे सर्व विनामोबदला, स्वखुशीने व कोणीही त्यांना न सांगता किंवा कोणाच्या आदेशाशिवाय ते करीत असत. त्यांचा हा वारसा पुढे जनार्दन गवळी यांनी आजतागायत सांभाळला आहे. दहा वर्षे रोजंदारी म्हणून आणि त्यानंतर २२ वर्षे सहा महिने नोकरीत असेपर्यंत गवळी यांनी पुतळ्याची स्वच्छता, देखभाल, पुष्पहार वाहून पूजा करणे इत्यादी कामे केलीच; पण, मे २०१७ मध्ये निवृत्त झाल्यापासून पुतळ्याच्या स्वच्छतेचे काम आजही ते मोठ्या भक्तीभावाने करीत आहेत. गवळी यांचे वैशिष्ट्य म्हणजे २२ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी एकही दिवस सुटी न घेता काम केले, तर एकूण कारकीर्दीत अवघ्या २५ रजा घेतल्या. सेवाभावाची ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच आपल्याला देत असल्याचे गवळी सांगतात.

◼️सर्वाधिक छायाचित्रे काढले जाणारे ठिकाण
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा हा कोल्हापुरातील सर्वाधिक छायाचित्रे काढले जाणारे ठिकाण आहे. छत्रपतींचा पुतळा, त्याभोवतीचे वर्तुळ उद्यान आणि त्यामागील विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय भवन या देखण्या पार्श्वभूमीवर छायाचित्र काढण्याचा मोह प्रत्येक अभ्यागताला होतोच. इथल्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये या पुतळ्याची आणि त्याच्या पार्श्वभूमीवरील अनेक छायाचित्रे असतातच. त्याखेरीज दीक्षान्त समारंभासह विविध राष्ट्रीय सणांचे, कार्यक्रमांचे साजरीकरण या प्रसंगीही हजारो विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये या पुतळ्याची छायाचित्रे स्मृती म्हणून जपली जातात. अशा प्रकारे दरवर्षी या पुतळ्याची अक्षरशः लाखो छायाचित्रे काढली जातात.

◼️शिवजयंतीचे भारावणारे वातावरण
शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीचे वातावरण तर अधिकच भारावून टाकणारे असते. सकाळपासून विद्यापीठ परिसरात सनईचे मंगलसूर वाजविण्यात येतात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे लावले जातात. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते आणि सर्व प्रमुख अधिकारी, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात येते. छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते. या प्रसंगी युद्धकलेची प्रात्यक्षिके, लेझीम, ढोल आणि झांजपथकांची सादरीकरणेही होतात. शिवजयंतीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला व्याख्यान, पोवाडा सादरीकरण इत्यादी उपक्रम आयोजिले जातात. परिसरातून शिवज्योती घेऊन जाणारे तरुण विद्यापीठातील पुतळ्याला अभिवादन करूनच पुढे मार्गस्थ होतात.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes