विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा प्रभावी उपक्रमाचे आयोजन
schedule24 Dec 25 person by visibility 62 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीची जाणीव निर्माण करत समाजासाठी सकारात्मक संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राहुल चव्हाण श्रीराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज, कुडित्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमली पदार्थांचे वाढते आकर्षण, त्यातून उद्भवणारे मानसिक ताण, शारीरिक हानी तसेच भविष्यातील कायदेशीर अडचणी याविषयी त्यांनी स्पष्ट शब्दांत माहिती दिली. “यशस्वी आयुष्यासाठी व्यसनमुक्ती हीच खरी गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
जनजागृती कार्यक्रम इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. रणजित शिरोडकर, शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विविध विभागांतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
अमली पदार्थांच्या विरोधात लढा देण्यासाठी जिल्हास्तरीय NCORD (Norco Co-Ordination Center) समितीमार्फत शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा व समाजात जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विवेक पाटील यांनी केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यक्रमाची माहिती संकलित करून विभागीय कार्यालयाकडे सादर केली जाणार आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटने शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण केली.
जनजागृती कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचे प्रोत्साहन लाभले.





