SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम; राधानगरीत धरणाचे सर्व सात दरवाजे उघडलेकोरे अभियांत्रिकी मध्ये “डिजिटल फाऊंड्री : कार्यशाळेचे उदघाटनदेशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा : मंत्री चंद्रकांत पाटीलअतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देशडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी; शिवाजी विद्यापीठाच्या 'टॉप टेन'मध्ये; अंतिम वर्ष अभियांत्रिकीची गुणवत्ता यादी जाहीरराज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर : आमदार सतेज पाटील; करवीर तालुका संपर्क सभा खेळीमेळीत राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट

जाहिरात

 

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू : सरन्यायाधीश भूषण गवई

schedule17 Aug 25 person by visibility 274 category

▪️शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
▪️सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा
▪️सरन्यायाधीश भूषण गवई हेच बेंचचे शिल्पकार :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर बेंचची निर्मिती होत आहे. ही न्याय व्यवस्था वकिलांसाठी नव्हे, तर गोरगरीबांसाठी उपलब्ध होत आहे. याठिकाणी शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे समानतेचे न्यायदान करा, असे आवाहन करतानाच सर्किट बेंच तयार झाले आहे. आता खंडपीठ उभारणीसाठी उच्च न्यायालयाने प्रस्ताव सादर करावा, ती मागणीही लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे केले.

कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर लवकरच होईल, त्यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांनी प्रयत्न करावेत, पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री तयार आहेत. सर्किट बेंचचे नियमित खंडपीठात रूपांतर होण्यासाठी जे काही लागणार आहे, त्याची पूर्तता उच्च न्यायालयाने लवकरात लवकर करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर कोल्हापूर येथे आज मेरी वेदर क्रीडांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक, न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे, खासदार शाहू महाराज छत्रपती, ॲड. संग्राम देसाई (सदस्य, बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा), कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाटील, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौतम ए. अंखड, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, न्यायमूर्ती शाम चांडक, राज्याचे ॲडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी. सिंग, ॲडव्होकेट जनरल गोवा राज्य देविदास पंगम, बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाचे अमोल सावंत, बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा सदस्य ॲड. वसंतराव भोसले, ॲड. विवेकानंद घाटगे, अध्यक्ष, ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ॲड. प्रशांत रेळेकर, बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा सदस्य ॲड. मिलिंद एस. थोबडे उपस्थित होते. याशिवाय राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, खंडपीठाच्या या 43 वर्षांच्या लढ्यामध्ये गेल्या 25 वर्षांपासून आपण स्वतः सहभागी आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 पासून या लढ्यात आहेत. त्यामुळे सर्किट बेंच झाल्यावरच कोल्हापूरमध्ये येईल, असे मी म्हणालो होतो. न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. त्यामुळे अगदी कमी वेळेत हा निर्णय उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या वतीने प्रत्यक्षात आला आहे. आज तो शब्द खरा होत असल्याचा आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले. पद हे अधिकार दाखवण्यासाठी नाही, तर समाजातील वंचितांच्या भल्यासाठी वापरण्याची आपल्या वडिलांची शिकवण होती. माझ्या नियुक्तीनंतर नियतीने ही संधी दिली आहे, असेही ते म्हणाले.

▪️सरन्यायाधीश पद नियुक्तीएवढाच आजचा क्षण आनंददायी
सर्किट बेंच शुभारंभाच्या निमित्ताने काल कोल्हापूरात आलो. कोल्हापूरकरांकडून दोन दिवसांत मिळालेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. शाहू महाराजांच्या कृतृत्वाच्या भूमीत त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाला न्याय देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील शेकडो वकील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच न्यायमूर्ती उपस्थित आहेत.

 सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झालेल्या दिवसाप्रमाणे आजचे क्षण आनंददायी आहेत, असे त्यांनी कोल्हापूरकरांच्या प्रेमाला प्रतिसाद देताना स्पष्ट केले.

▪️कोल्हापूर बेंच सामाजिक व आर्थिक न्यायाचा मैलाचा दगड ठरावा
भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना सर्वांना समान न्यायाची अपेक्षा करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामते, भारतात लोकशाही बळकट होण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण होणे आवश्यक आहे. पक्षकारांना मुंबई हे ठिकाण दूर पडत होते. दोन एकर जमिनीच्या प्रश्नांसाठी त्यांना मुंबईचे हेलपाटे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोल्हापूर येथे निर्माण होणारे सर्किट बेंच हे दुर्गम भागातील वंचितांना न्याय देणारा मैलाचा दगड ठरावा, यासाठी बेंचच्या न्यायप्रक्रियेतील सर्वांनी प्रत्यक्ष योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

▪️बाबासाहेबांच्या लंडनच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बेंचच्या निर्मितीसाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला आहे. गेल्या महिनाभरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधी व न्याय विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत काम केले आहे. महाराष्ट्राने मनावर घेतल्यास कोणतेही काम अशक्य नाही. विशेष म्हणजे या मंचावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लंडन येथील बाबासाहेबांच्या घराला शासनामार्फत ताब्यात घेतले. या घराला मी दोन वेळा भेट दिली आहे. या घरात शाहू महाराजांचे पत्र आहे, ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी केलेल्या मदतीचा उल्लेख आहे. शाहू महाराजांच्या मदतीने बाबासाहेब शिक्षण पूर्ण करू शकले. शाहू महाराजांचे हे उपकार आम्हा सर्वांवर आहेत. त्यामुळे या भूमीत काही करता आले, याचा आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.

▪️सरन्यायाधीश भूषण गवई हेच बेंचचे शिल्पकार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मागील जवळपास 50 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच उद्यापासून सुरू होत आहे, हा ऐतिहासिक क्षण असून यामुळे कोल्हापूरसाठी विकासाचे दालन खुले झाले आहे. या निर्णयामध्ये खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला मिळाले आहे. खरेतर या बेंचचे शिल्पकार सरन्यायाधीश भूषण गवई हेच आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि केवळ सर्किट बेंचची मंजुरीच नाही, तर उद्घाटनाची तारीखदेखील त्यांनीच ठरवली. त्यांचा पाठपुरावा प्रचंड होता. उच्च न्यायालयाचे सरकारला पत्र आल्यानंतर लवकरात लवकर उत्तर देण्याचेही तेच सांगत होते. त्यामुळे बेंचच्या निर्मितीचे श्रेय त्यांना द्यायला हवे. यावेळी त्यांनी शेंडा पार्क येथील 68 कोटी रुपयांच्या 25 एकर जमिनीचे हस्तांतरण उच्च न्यायालयाला जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच कोल्हापूरच्या नावलौकिकाला साजेशी इमारत राज्य शासन उभी करेल, असे आश्वासनही दिले.

▪️सामाजिक न्यायाचे वर्तुळ बेंचमुळे पूर्ण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका कोल्हापूरात मांडून देशाला समानतेचा संदेश दिला होता. त्याच कोल्हापूरात फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा जोपासणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मार्गदर्शनात सर्किट बेंच स्थापन होत आहे. सामाजिक न्यायाचा परिघ विस्तारत आहे. या घटनेने सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य गरीब पक्षकारांना न्याय मिळेल. कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण ॲड. संग्राम देसाई यांनी केले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि बार कौन्सिल अध्यक्ष ॲड. अमोल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन कणकवली येथील  ॲड.उमेश सुरेश सावंत यांनी केले.

*सत्कार व स्मरणिका प्रकाशन*
या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बार कौन्सिलमार्फत सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बेंच मंजुरीतील विशेष योगदानाबद्दल सन्मान व सत्कार करण्यात आला. यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक, स्मृती पाटवा (इचलकरंजी), विलास गायकवाड (संयुक्त सचिव, कायदा व न्याय विभाग), अनिकेत जाधव-कसबेकर, अतुल चव्हाण (ठेकेदार), अमोल येडगे (जिल्हाधिकारी, कोल्हापूर), के. मंजुलक्ष्मी (आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका) तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे, रणजित मोरे आणि मोहित शाह यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विशेष स्मरणिका आणि पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आ.सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आ.अरुण लाड, आ.विश्वजित कदम, आ.राजेद्र पाटील यड्रावकर, आ.अमल महाडिक, आ.अशोकराव माने, आ.राहुल आवाडे, आ.शिवाजी पाटील, आ.गोपीचंद पडळकर, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवळे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, सहसचिव विलास गायकवाड, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील  यावेळी उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes