नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षा
schedule23 Oct 26 person by visibility 97 categoryराज्य
◼️जिल्ह्यातील २४ हजार ८०२ नवसाक्षर परीक्षेला बसणार; शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचे आवाहन
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘साक्षरतेकडून समृद्धीकडे’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील नवसाक्षरांची परीक्षा रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. असाक्षरांची नोंदणी करण्यात आलेल्या संबंधित शाळांमध्ये ही परीक्षा होणार असून, जिल्ह्यातील २४ हजार ८०२ नवसाक्षरांनी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) सुवर्णा सावंत यांनी केले आहे.
देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान आणि जीवन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शिक्षक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि इच्छुक व्यक्तींच्या सहभागातून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने असाक्षरांना शिक्षण दिले जात आहे.
◼️१५० गुणांची परीक्षा
ही परीक्षा एकूण १५० गुणांची असून, परीक्षेचा कालावधी तीन तासांचा आहे. लेखन, वाचन आणि संख्याज्ञान या तीन घटकांसाठी प्रत्येकी ५० गुण निर्धारित करण्यात आले आहेत. दिव्यांग परीक्षार्थींना ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनामार्फत प्रमाणपत्र व गुणपत्रक दिले जाणार आहे.
◼️तालुकानिहाय परीक्षार्थींची संख्या
गडहिंग्लज – १,८७४, राधानगरी – ३,६७१, भुदरगड – २,१४२, पन्हाळा – १,३९८, शाहूवाडी – २३१, चंदगड – ३,४६३, आजरा – २,१०७, करवीर – २,३३५, हातकणंगले – २,५८६, गगनबावडा – १०७, कागल – २,४९८, शिरोळ – २,०१४ आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र – ३७६.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत नवसाक्षरांनी निर्धारित दिवशी संबंधित शाळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी आणि साक्षरतेच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) सुवर्णा सावंत यांनी केले आहे.